विद्या तारा यांचे ‘वेव्हज ऍन्ड रॉक्स’ प्रदर्शन सुरू
प्रसिद्ध रंगलेखिका विद्या तारा यांचं ‘वेव्हज ऍन्ड रॉक्स’ हे चित्रप्रदर्शन अंधेरी कुर्ला रोडवरील हॉटेल लीलाच्या ‘गॅलरी लिला’मध्ये १४ ऑक्टोबरपासून सुरु झाले असून ते २० ऑक्टोबर पर्यंत दुपारी १२ ते रात्री ९ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुलं राहील.
चित्रकार विद्या तारा यांनी तैलरंगात कॅनव्हासवर चितारलेला गोव्याचा सागर किनारा या चित्रप्रदर्शनात मांडला आहे. निसर्गाबद्द्ल असलेल्या आंतरीक उर्मीना कॅनव्हासवर वाव करून देताना फेसाळत्या लाटांची सागर किनार्यावरच्या खडकांशी होणारी टक्कर त्यानी आपल्या चित्रांमधून हुबेहूब साकार केली आहे.
आर्ट सोसायटी ऑफ इंडीयाच्या सदस्या असलेल्या विद्या यांनी कर्नाटक विद्यापीठात आपलं कलाशिक्षण पुर्ण केलं. निसर्गाची जन्मजात आवड असलेल्या या रंगलेखिकेने कॅनव्हासवर नेहमी ठळक रंग आणि फ्लॅट ब्रशने तैल रंगात चित्रं रंगवली आहेत. लहरी समुद्राच्या अनेक अदा कॅनव्हासवर चितारताना त्याच्या लाटांचा वेग, आवेग, फेसाळणं आणि फुटून जाणं अशा कितीतरी तर्हा आणि पाण्याच्या अनेक रंगछटा यांना चित्रकर्तीने मोठ्या ताकतीने सादर केल्या आहेत.
चित्रकार विद्या तारा चित्रकलेला व्यक्त होण्याचं माध्यम मानत आल्या आहेत. समुद्राच्या लाटात त्याना लय आणि तालाचं जे दर्शन घडतं तेच त्यांच्या चित्रामधून साकार झालेलं पहायला मिळतं. समुद्राच्या मार्यादा ओलांडून बाहेर येवू पाहाणार्या फेसाळत्या लाटा आणि अथांग सागर यांची ही मनोहारी चित्रं आपणाला नकीच मोहून टाकतील.