सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर दिग्दर्शित नवा चित्रपट
चित्रपट म्हणजे समाजमनाचा आरसा असतो या श्रद्धेने वैविध्यपूर्ण विषयांवर चित्रपटनिर्मिती करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा समावेश होतो. दोघी, वास्तुपुरुष, अस्तु, देवराई, बाई, पाणी, कासव या चित्रपटांसाठी तब्बल ७ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेली ही दिग्दर्शक द्वयी आता ‘वेलकम होम’ हा चित्रपट घेऊन येत आहे.

बाईचं घर नेमकं कोणतं? तिच्या आई-वडिलांचं, नवऱ्याचं की तिचं स्वतःचं? असा प्रश्न या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. घर या संकल्पनेभोवती गुंफलेल्या नात्यांचा शोध घेणाऱ्या या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन, स्पृहा जोशी, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, दीपा श्रीराम, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, सारंग साठ्ये, अश्विनी गिरी, अभय कुलकर्णी, बालकलाकार प्रांजली कांबळे यांची प्रमुख भूमिका आहे.
कट्यार काळजात घुसली, सावर रे, त्या रात्री पाऊस होता या व अशा अनेक आशयघन चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स निर्मित ‘वेलकम होम’ हा १५ वा मराठी चित्रपट आहे. विनय बेळे, अभिषेक सुनील फडतरे, दिपककुमार भगत, अर्पण भुकनवाला हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.