समिना साचक यांचे ‘वाईल्ड एंचान्टर्स’ प्रदर्शन सुरु
टांझानियामधल्या सुप्रसिद्ध रंगलेखिका समिना साचक यांनी अलिकडच्या काळात रेखाटलेल्या चित्रकृतींचं ‘वाईल्ड एंचान्टर्स‘ हे चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे ३१ ऑक्टोबरपासून सुरु झाले असून, ते ६ नोव्हेंबर पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.
टांझानियामधल्या रंगलेखिकेचं हे जहांगीर कला दालनात भरणारं पहिलंच प्रदर्शन आहे. टांझानियासारख्या आफ्रिका खंडातल्या देशात समिना साचक यांनी ऎशीच्या दशकात स्वत:ला कलेला वाहून घेतलं. तिथल्या जंगल संपत्तीला आणि प्राण्यांना कॅनव्हासवर स्थान देऊन कलेच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा हा त्यांचा स्तूत्य उपक्रम आहे.
स्त्रीला जगभरात मिळणारी दुय्यम वागणूक पाहून समिनाचा आत्मसंन्मान सतत जागता राहिला आणि संधी मिळेल तेव्हा किंवा संधी निर्माण करून त्यांनी कलेचं सोनं केलं. शिवणकाम करताना त्यांच्या आईने कापडावर केलेली अदाकारी आणि शिवलेले कपडे त्या लहानपणापासून पहात आलेल्या आहेत. आपल्या आईकडूनच कलेची प्रेरणा घेणार्या या चित्रकर्तीने स्वत:ला आईच प्रतीरुप मानलं आहे. कलाकाराला कुठल्याची मर्यादा बंधन घालू शकत नाहीत. त्यांची कलाच बोलत असते आणि ती सर्व जगताशी संवाद साधते.
अठ्ठावीस वर्षांच्या अथक कला सेवेनंतर समिना साचक यांना आशिया खंडात आपली कला पेश करण्याची संधी चालून आली आहे. आफ्रिकेच्या जंगलातील प्राण्यांच्या भेदक नजरा आणि विशिष्ट हालचाली, वागणूक यांचा सुरेख नजराणा या चित्रप्रदर्शनामधून त्यानी पेश केला आहे.
अफ्रिकन हत्ती, सिंह, बिबळ्या गेंडा, आयबीस, झेब्रा अशा जंगली प्राण्यांचा कॅनव्हासवरचा वावर कुंचल्याच्या सहाय्याने जिवंत झालेला या ठिकाणी पहाता येईल. मुंबईकर कलारसिकांनी याचा जरूर लाभ घ्यावा.