मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने चित्रपट समीक्षण स्पर्धा
दरवर्षी चित्रपट महोत्सवासोबतच वेगळा उपक्रम राबवणाऱ्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यावर्षी तरुणाईचे लक्ष वेधून घेणार आहे, तरुणांसाठी या वर्षी चित्रपट समीक्षण स्पर्धा आयोजित केली असून, त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
समीक्षणाची कार्यशाळा ९ डिसेंबर रोजी कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या आवारात होणार आहे, असे महोत्सव समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील अग्रगण्य समजला जाणाऱ्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नांदी सुरु झाली. पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेत महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी २० जानेवारी ते २६ जानेवारीदरम्यान महोत्सव होणार असल्याची घोषणा केली. हा महोत्सव या मातीतला असल्यामुळे हा सर्वांचाच महोत्सव असून प्रत्येकाच्या सूचनेचं येथे स्वागतच असेल, असे प्रतिपादन डॉ. जब्बार पटेल यांनी केले.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने हा महोत्सव आयोजित केला जातो. एखाद्या नेत्याच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट महोत्सव होणे हे कदाचित भारतातील एकमेव उदाहरण असेल. यशवंतराव हे रसिक होते. जगभरातील उत्कृष्ट चित्रपटांचा त्यांनी आस्वाद घेतला होता. म्हणूनच त्यांच्या नावाने या महोत्सवाचे आयोजन केले जाते अशी माहिती डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.
हा महोत्सव २० जानेवारी ते २६ जानेवारीदरम्यान यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या प्रांगणात रंगणार असून चित्रपट रसिकांसाठी कार्यक्रमाची रेलचेल असेल.
यावर्षी मुंबई विद्यापीठाचे महत्वाचे सहकार्य लाभणार असून चित्रपटासंदर्भातील अभ्यासपूर्ण उपक्रमांचा समावेश या महोत्सवात असेल. म्हणूनच यंदाचा महोत्सव हा विद्यार्थी आणि तरुणांसाठी मह्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले.
महोत्सवात नेहमीच नाविन्यपूर्ण कल्पना राबवल्या जातात. त्याचाच भाग म्हणून गेल्यावर्षीपासून स्मिता पाटील व्याख्यानमालेची सुरुवात केली होती. पहिल्या व्याख्यानमालेत प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी व्याख्यान दिले होते. तसेच पटकथा कशी लिहावी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस प्रसिद्ध पटकथाकार अंजुम राजाबली यांनी मार्गदर्शन केले होते.
या वर्षी चित्रपट समीक्षण स्पर्धा आयोजित केली आहे. तसेच चित्रपट समीक्षणा संदर्भात कार्यशाळा मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहे. ९ डिसेंबर रोजी ही कार्यशाळा कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या आवारात होणार आहे, असे महोत्सव समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी सांगितले.
यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे, आस्थापना व्यवस्थापक संजय बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.