युवराज पाटील यांच्या चित्रांचे
३१ ऑक्टोबरपासून प्रदर्शन
कोल्हापूर येथील प्रसिद्ध चित्रकार युवराज पाटील यांचे ‘फ्रोझन मोमेन्ट’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. ते सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत कलारसिकांना नि:शुल्क बघता येतील.
युवराज पाटील यांनी कोल्हापूरच्या प्रसिद्ध दळवीज इन्स्टिट्यूट येथून आपले चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर ते मुंबईत आले. युवराज यांचा जन्म कोल्हापूरमधील पिंपळवाडी येथे झाला. पिंपळवाडीच्या ग्रामीण भागात निसर्गाच्या सानिध्यात ते मोठे झाले. त्यामुळे तिथल्या निसर्गाचा प्रभाव युवराज यांच्या चित्रांमध्ये दिसतो. युवराज पाटील यांनी सुरुवातीला जलरंगाच्या माध्यमात काम केले. प्रचंड मेहनत आणि सराव यांच्या साथीने त्यांनी जलरंगासारख्या अवघड माध्यमावर प्रभुत्व मिळवले. पुढे एक्रलिक, ऑइल कलर यासारख्या माध्यमांमध्ये काम केल्यानंतर युवराज हे ब्लॅक अँड व्हाईट आणि चारकोल माध्यमाकडे वळले.
चारकोल माध्यमातील कलाकृतींनी त्यांना आज वेगळी ओळख दिली आहे. चारकोल हे माध्यम वापरण्यास सोपे नसते. ते वापरण्यासाठी रेखाटनावर प्रभुत्व असणे महत्वाचे आहे. सरावातूनच रेखाटनांवर प्रभुत्व मिळवता येते. त्यामुळे पाटील यांच्या चित्रातून आपल्याला कित्येक वर्षांची कला साधना दिसते. त्यांच्या काही कलाकृती या पूर्ण चारकोल माध्यमात केलेल्या आहेत तर काहींमध्ये चारकोल आणि रंग या दोहोंचा वापर केलेला आहे. तेजस्वी रंग आणि चारकोल मधील रेखाटन या दोहोंच्या मिलाफातून त्यांनी सुंदर परिणाम कलाकृतीत साधला आहे. ग्रामीण भागातील निसर्ग आणि अध्यात्मिकता यांची रूपकात्मक मांडणी आपल्याला पाटील यांच्या चित्रात दिसून येते. काही कलाकृतींमध्ये मुंबई मधील नागरी जीवनाचे चित्रण दिसते. त्यामुळे पाटील यांच्या चित्र विषयांचा आवाका जरी मोठा असला तरी चारकोल या माध्यमाचा ठळकपणे केलेला वापर हे त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य आहे.
युवराज पाटील यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीच्या माध्यमातून आपले चित्रकार म्हणून वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत. २०१५ सालाची केंद्र सरकारची मानव संसाधन विकास शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे. त्याचबरोबर जहांगीर गॅलरी, नेहरू सेंटर, कमलनयन बजाज गॅलरी, ओबेरॉय गॅलरी, आर्टिस्ट सेंटर अशा महत्वाच्या गॅलरीमधून त्यांचे चित्र प्रदर्शन आयोजित झाले आहे. मुंबईबरोबरच दिल्ली, बंगरुळु, गोवा, अहमदाबाद, बडोदा यासारख्या शहरांमधून त्यांचे कला प्रदर्शन आयोजित झालेले आहे.
प्रस्तुत फ्रोझन मोमेन्ट या प्रदर्शनात त्यांनी दैनंदिन जीवनात पाहिलेल्या दृश्याने नाट्यमय स्वरूपात कॅनव्हासवर मांडले आहे. निसर्गाने आपल्याला दृष्टीचे वरदान दिलेलं आहे. या दृष्टीमुळे आपण सुंदर निसर्गाचा अनुभव घेतो. जी दृश्ये आपण बघतो ती आपल्या मनःपटलावर कोरली जातात किंवा एकप्रकारे मेंदूमध्ये गोठली जातात.
अशा मनावर प्रभाव टाकणाऱ्या सुंदर क्षणांचा पटल फ्रोझन मोमेन्ट या प्रदर्शनात रसिकांना पाहता येईल. ही केवळ निसर्ग दृश्ये नसतील तर चित्रकाराच्या कलात्मक दृष्टीचा साज त्यांच्यावर चढवलेला असेल. त्यामुळे ही चित्रे पाहणाऱ्याला अधिकच मोहक दिसतील हे निश्चित. प्रस्तुत प्रदर्शन हे कलारसिकांसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य खुले आहे.