लग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गोष्ट
हलक्या फुलक्या वादांची आणि प्रेमाच्या नात्याची गोष्ट सांगणार आहे ‘झी मराठी’ची आगामी मालिका ‘तुझं माझं ब्रेक अप’. येत्या १८ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
प्रेमविवाहाच्या गाठी या प्रेमानेच बांधल्या जातात पण काही काळ लोटला की यातील केवळ विवाह एवढाच शब्द उरतो आणि प्रेमाचा गोडवा हळू हळू ओसरु लागतो. लग्नाआधी एकमेकांशी कायम प्रेमाने वागण्याच्या, कायम सोबत देण्याच्या, कधीही न भांडण्याच्या आणाभाका हवेत विरुन जातात आणि कोणत्या गोष्टीवरुन भांड्याला भांडं लागतं याचा पत्ताही लागत नाही. थोडक्यात काय प्रेमविवाह झालेल्यांच्या घरोघरी या समस्याच्या चुली पेटलेल्या दिसतातच आणि त्यातून वादाचा धूरही निघताना आपण कायम बघतो. प्रेमावर वाद कुरघोडी करतात आणि तेच नात्याच्या आड येतात. अर्थात हे वाद अतिशय छोट्या छोट्या गोष्टींवरुन असतात पण राईचा पर्वत कधी होतो ते दोघांनाही कळत नाही.

लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस प्रेम आणि आनंदात पार पडतात पण त्याचा गोडवा ओसरला की मग सुरु होते संसाराची तारेवरची कसरत. लग्नाआधी एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकणारे हे दोघे लग्नानंतर कोणताही आडपडदा न ठेवता एकमेकांच्या चुका काढायला लागतात आणि भांडायलाही लागतात. लग्नाआधी एकमेकांचा दुरावा एक क्षणही सहन न करणारे आता एकमेकांनाच सहन करतायत की असं चित्र निर्माण होतं. आणि बघता बघता हे भांडण एवढ्या टोकावर जातं की ते दोघे वेगळं होण्याचाही निर्णय घेतात.

‘तुझं माझं ब्रेक अप’ या मालिकेत समीरची भूमिका सायंकित कामत हा अभिनेता साकारत आहे तर मीराच्या भूमिकेत केतकी चितळे ही अभिनेत्री आहे. याशिवाय मालिकेत रोहिणी हट्टंगडी, उदय टिकेकर, विजय निकम, राधिका हर्षे, संयोगिता भावे, रेश्मा रामचंद्र, उमेश जगताप, मधुगंधा कुलकर्णी आदी अनुभवी कलाकारांची फौजही आहे. सोमील क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन हेमंत देवधर यांचं आहे. मालिकेची कथा शेखर ढवळीकर यांची असून पटकथा चिन्मय मांडलेकर यांची आहे तर संवाद मुग्धा गोडबोलेंचे आहेत. येत्या १८ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. ही मालिका झी मराठीसह झी मराठी एचडीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.