हटके काम करणाऱ्यांचा सन्मान
मुंबईमध्ये झालेल्या एका शानदार सोहळ्यात ‘YZ अवॉर्ड्स’च्या वितरणाबरोबर या चित्रपटाचं ‘म्युझिक लाँच’सुद्धा करण्यात आलं. आत्तापर्यंत चित्रपटांना अवॉर्ड्स मिळत आले आहेत पण YZ या अत्यंत हटके नाव असलेल्या, १२ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या आगामी चित्रपटाकडूनच हे हटके अवॉर्ड्स दिले गेले.
चित्रपटाचे लेखक क्षितिज पटवर्धन यांची ही भन्नाट कल्पना! समाजातील ‘आऊट ऑफ द बॉक्स’ काम करणाऱ्या, म्हणजेच YZगिरी करणाऱ्या व्यक्तींचा, विचारांचा आणि संस्थांचा सन्मान म्हणून हे पुरस्कार देण्यात आले. आत्तापर्यंत असे पुरस्कार कधीच दिले गेले नव्हते, त्यामुळे या आगळ्या वेगळ्या सोहळ्याला चित्रपटाचे निर्माते एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे संजय छाब्रिया आणि प्रतिसाद प्रॉडक्शनचे अनीश जोग, दिग्दर्शक समीर विद्वांस, संगीतकार सौरभ, जसराज व ऋषिकेश, तसेच जसराज जोशी, केतकी माटेगावकर, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, श्रुती आठवले, मधुरा दातार, अवधूत गांधी हे चित्रपटाचे गायक-गायिका,शिवाय चित्रपटातील कलाकार सागर देशमुख, अक्षय टंकसाळे, मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर, पर्ण पेठे आणि सिनेसृष्टीतील व समाजातील इतर मान्यवरांनी पावसातदेखील आपल्या उपस्थितीने आवर्जून हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला रंगत आणण्याचं काम प्रसिद्ध निवेदक अमेय वाघने आपल्या अत्यंत खुसखुशीत निवेदनाने केलं.
कार्यक्रमाची सुरुवातच प्रसिद्ध सरोद वादक सारंग कुलकर्णी यांच्या बहारदार सुरांनी झाली. शिवाय पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाच्या मध्ये-मध्ये चित्रपटातील गाण्यांचं, चित्रपटाचे गायक-गायिका यांनी केलेलं सुरेल सादरीकरण म्हणजे उपस्थितांना मेजवानीच होती!
चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीच तरुणांच्या तना-मनात ठसलेलं ‘ओ काका… ‘ हे गाणं, शिवाय केतकी माटेगावकरनी या चित्रपटासाठी गायलेलं संस्कृत गाणं आणि तेही रोमँटिक म्हणजे चित्रपटाच्या हटकेपणाचा कळसच! या व चित्रपटातील इतर गाण्यांनी सगळ्या आमंत्रितांना अक्षरशः आपल्या तालावर नाचवलं !
कार्यक्रमात दाखवण्यात आलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरनं संपूर्ण सिनेसृष्टीत प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. या कार्यक्रमात सन्मानित केलेल्या व्यक्तीसुद्धा हटक्याच आहेत. अवॉर्ड्सचे विजेते ठरले आहेत मुंबईतील अनिकेत, सुशांत, विश्वजित आणि मयंक या चार तरुणांचा ग्रुप! यांनी एक अनोखी ‘लँडस्लाईड डिटेक्शन टेक्नॉलॉजी’ विकसित केली आहे आणि तीही अवघ्या आठ हजार रुपयात! एखाद्या जागेवर होणारं भूस्खलन वेळीच हेरणं आणि त्याची माहिती सोशल मीडियामार्फत वेळीच जनतेपर्यंत पोहोचवून हजारो लोकांचे प्राण वाचवण्याच्या त्यांच्या या उदात्त कामाबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला. नंतर औरंगाबादच्या ‘केअर इनिशिएटिव्ह’ या अफलातून ग्रुपच्या अभिजीत धामणगावकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा ग्रुप समाजातील अनाथ मुलांना कपडे, पौष्टिक खाऊ पुरवण्याचं काम तर करतोच शिवाय एच.आय.व्ही. बाधित मुलांच्या आश्रमात जाऊन त्यांचे वाढदिवस साजरे करणं आणि दुर्दैवानं ही मुलं गेल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी निधी उभा करण्याचं काम या ग्रुपतर्फे करण्यात येतं.
नंतर पुरस्कार देण्यात आला रायगड जिल्ह्यातील महाडच्या डॉ. गणराज आणि अर्चना जैन या दाम्पत्याला. प्राण्यांना माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या या दाम्पत्यानं जखमी प्राण्यांसाठी महाड येथे हेल्पलाईन सुरु केलीय! त्यांनी गेल्या दहा वर्षात रस्ता अपघातात जखमी झालेल्या ४००० हून जास्त पशु-पक्ष्यांना योग्य तो उपचार करून जीवदान दिलंय. शिवाय जवळ जवळ ४००० पेक्षाही जास्त सापांना, मानवी वस्तीतून पकडून पुन्हा जंगलात सोडण्याचं जोखमीचं काम केल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आलं.
या व्यतिरिक्त नेचर ऑफ नाशिक, मिरॅकल कुरियर्सचे ध्रुव लाक्रा- मुंबई, परिवर्तन संस्था पुणे, बोधिसत्त्व खंडेराव- यवतमाळ, राहुल रामुगडे-मुंबई, दादाराव बिल्होरे-मुंबई, शांताबाई यादव-गडहिंग्लज या अवलियांनादेखील वेगवेळ्या YZ गिरी निमित्त, YZ अवॉर्ड्स देण्यात आले.