अनोखा व्दिनाट्यानुभव १६ जुलैला!
ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘मग्न तळ्याकाठी’चा अनोखा सलग नाट्यानुभव शनिवार १६ जुलै २०१६ रोजी ठाण्यात प्रथमच सादर होत आहे.

‘जिगीषा’ आणि ‘अष्टविनायक’च्या ‘वाडा चिरेबंदी’नंतर ‘मग्न तळ्याकाठी’चंही महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी भरभरून स्वागत केलं. ‘वाडा चिरेबंदी’ जिथे संपत त्यानंतरचा १० वर्षांचा कालावधी, त्यातली स्थित्यंतरं, व्यक्तिरेखांचा विकास, त्यांचं बदलणारं अंतरंग ‘मग्न तळ्याकाठी’मध्ये व्यक्त होतं. त्यामुळे बदलती एकत्र कुटुंब पद्धती, बदलता काळ आणि भावभावनांचा, नात्यांचा हा भव्य पट एकाच दिवशी, एकाच थिएटरमध्ये एकापाठोपाठ बघणं म्हणजे नाट्यरसिकांसाठी एक पर्वणीच ठरते.
या अभिनव प्रयोगात निवेदिता सराफ, वैभव मांगले, प्रसाद ओक, भारती पाटील, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, नेहा जोशी, दीपक कदम या ताकदीच्या कलावंतांसोबत दुसऱ्या भागात सिद्धार्थ चांदेकर, राजश्री ठाकुर आणि चिन्मय मांडलेकर हे आजचे आघाडीचे कलावंत आहेत.
प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य, आनंद मोडक – राहुल रानडे यांचं पार्श्व-संगीत, रवि– रसिक यांची प्रकाश योजना, प्रतिमा जोशी- भाग्यश्री जाधव यांची वेशभूषा ‘मग्न तळ्याकाठी’ला लाभली आहे. या नाटकाच्या निर्मितीमध्ये दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर या निर्मात्यांना संज्योत वैद्य आणि अर्जुन मुद्दा या सहनिर्मात्यांची साथ लाभली आहे.