पॉप्युलरचे ऑडिओ बुक्समध्ये पहिले पाऊल
कुसुमाग्रजांच्या ‘प्रवासी पक्षी’ या संग्रहातल्या निवडक कवितांचे श्रीराम लागू यांनी केलेले वाचन ध्वनिमुद्रित होऊ शकले आणि कवितेच्या पलीकडले या ऑडिओ सीडीच्या स्वरूपात ते पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे.
कुसुमाग्रजांच्या उत्तरकविता म्हणजेच छंदोमयी, मुक्तायन आणि पाथेय या संग्रहामधल्या निवडक कवितांचा संग्रह प्रवासी पक्षी. स्वतः उत्तम कवी आणि काव्यरसिक असणाऱ्या प्रा. शंकर वैद्य यांनी या संग्रहासाठी कवितांची निवड केली होती. या कवितांचे रसग्रहण करणारी प्रा. वैद्य यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना संग्रहाला जोडली आहे. कुसुमाग्रजांच्या चाहत्यांमध्ये विशेष प्रिय असलेल्या प्रवासी पक्षी या संग्रहाची विशेष आवृत्ती कवितेच्या पलीकडले या ऑडिओ सीडीसह मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने दि. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रकशित होणार आहे. एस. एम. जोशी सभागृह, पुणे येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल हे असून पंडित सत्यशील देशपांडे प्रमुख पाहुणे असतील. या दोघांच्या हस्ते या सीडीचे प्रकाशन होईल. श्रीराम लागू आणि दीपा श्रीराम हेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
पॉप्युलर प्रकाशन आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
एक प्रतिभासंपन्न अभिनेता, साहित्य, संगीतादी कलांचा जाणकार रसिक अशी श्रीराम लागू यांची ओळख आहे. नाटक आणि अभिनय हा त्यांचा प्राण आहे आणि इंग्रजी-मराठी साहित्याचे वाचन, विशेषतः कविता आणि कुमार गंधर्वांचे गाणे हे त्यांना संपन्न, प्रगल्भ करणारे त्यांचे छंद आहेत. कॉलेजजीवनापासूनच नाटकांच्या बरोबरीने श्रीराम लागू मराठी कवितेत रमले. बा. सी. मर्ढेकर, पु. शि. रेगे, इंदिरा संत, कुसुमाग्रज हे त्यांचे आवडते कवी. आपल्या या आवडत्या कवींच्या कविता मराठी प्रेक्षकांच्या अधिक जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी केला होता मर्ढेकरांच्या कवितावाचनाच्या जाहीर कार्यक्रमाच्या रूपाने. मर्ढेकरानंतर कुसुमाग्रज, पु. शि. रेगे, इंदिरा संत, विंदा करंदीकर यांच्या कवितांचेही असेच कार्यक्रम करण्याची त्यांची इच्छा होती, पण त्या वेळी ते शक्य झाले नाही.
कुसुमाग्रजांची कविता त्यांच्या पुस्तकांशिवाय अनेक स्वरूपात रसिकांसमोर आलेली आहे. चाली लावून, संगीतबद्ध, नाट्यरूप, काव्यवाचनाच्या निमित्ताने. प्रवासी पक्षीतील कविता निरनिराळ्या कलाकारांच्या आवाजातही उपलब्ध आहेत. तरीही श्रीराम लागू यांच्या वाचनाने ही कविता अधिक अर्थपूर्ण वाटते हा अनुभव आहे.
‘नटसम्राट’, ‘मुख्यमंत्री’, ‘राजमुकुट’ या नाटकांतून श्रीराम लागू यांना एक अभिनेता म्हणून आधीच्या पिढीने पाहिले आहे. आता प्रवासी पक्षी या संग्रहाच्या विशेष आवृत्तीबरोबर त्यातील काही कविता लागूंच्या वाचनाद्वारे रसिकांपर्यंत नव्याने पोहोचतील. कविता कशी वाचावी याचा हा वस्तुपाठच ठरावा.
कवितेच्या पलीकडले या ऑडिओ सीडीसह प्रवासी पक्षीची ही विशेष आवृत्ती रु. ३००/- ला सर्वत्र उपलब्ध होत आहे. या ऑडिओ सीडीमध्ये कुसुमाग्रजांच्या पुढील कवितांचा समावेश करण्यात आला आहे. कणा, हुकूमशहा, गाभारा, अखेर कमाई, प्रार्थना, म्हातारा… म्हणतोय… , संशोधक, संत, आश्चर्य, सीमा, असीम, नट, कलोजस, याचक, प्रेमयोग, संस्कृती, झोपेन माताजी, याच मातीतून, तो, भीती, पुतळा, नक्षत्रांनो, अनामंत्रित, पराभवासाठी, मी, प्रार्थना.
पॉप्युलर प्रकाशनाच्या मराठी विभागाने काम सुरू करेपर्यंत दीडशे वर्षे मराठीतून पुस्तके प्रसिद्ध होतच होती. परंतु १९५२ पासून पॉप्युलरने मराठी पुस्तकप्रकाशनाला सुरुवात केली आणि मराठी प्रकाशनाचा नवा अध्याय सुरू झाला, एक नवा इतिहास रचला गेला असे म्हणता येईल. याच जिद्दीने पॉप्युलरने ऑडिओ बुक्समध्ये टाकलेले हे पहिले पाऊल रसिकांच्या सहभागामुळे यशस्वी ठरेल असा विश्वास वाटतो.