गाण्यांनी वाढवली चित्रपटाची उत्सुकता
४ डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार
येत्या ४ डिसेंबरला सिनेमागृहात दाखल होणा-या ‘बाय गो बाय’ या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा कलावंत आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत रंगला. रोम्यांटिक आणि नृत्यप्रधान गाण्यांसह सिने रसिकांना टाळ्या आणि शिट्ट्या वाजवायला खुणावणा-या ठसकेबाज एटमसॉंगने या सोहळ्यात धम्माल केली. त्यातही तोडीस तोड असणा-या प्रोमोशन सॉंगने ‘बबबब बाय गो बाय’ने या चित्रपटातील गोष्टीची उत्सुकता वाढवली.
निर्मिती सावंत, विजय पाटकर, नयन जाधव, शीतल फाटक, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर अशी उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आर. एस. सिनेव्हिजनच्या प्रदीप कचेर पाटील व नरेश गणपत ठाकूर यांनी केली आहे. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन विजय पगारे यांनी केले आहे. सुरेश देशमाने यांचे अनुभवी छायालेखन लाभलेल्या या चित्रपटाचे संगीतकार आहेत विजय गटलेवार!
संगीत प्रकाशन सोहळ्यात निर्माते, कलावंत आणि तंत्रज्ञांसह या चित्रपटाच्या चाहत्यांची, आप्तस्वकीयांची गर्दी झाली होती. सुरुवातीला या चित्रपटाच्या निर्मितीमागची भूमिका निर्माते प्रदीप कचेर पाटील व नरेश गणपत ठाकूर यांनी विशद केली. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर या चित्रपटातील तिन्ही गाण्यांची झलक पाहून उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्यांची आतिषबाजी करत रेश्मा सोनवणे हिने गायिलेल्या ‘मी हाय रे समिन्द्राची राणी…’ या एटमसॉंगवर ताल धरला. या गाण्याचे सादरीकरण केल्यानंतर रेश्मा म्हणाली की, ‘हे गाणे गाताना मला खरोखरच समुद्राची राणी असल्याचे वाटले. इतकी या गाण्यात बुडून गेले होते.’
२००६च्या ‘सारेगम’मधून संगीतक्षेत्रात गायक म्हणून आपली ओळख अधोरेखित करणारे विजय गटलेवार या चित्रपटाच्या निमित्ताने संगीतकार म्हणून पदार्पण करत आहेत. या चित्रपटाच्या म्युझिक लॉंचप्रसंगी त्यांनी त्यांच्या चंद्रपूर ते मुंबई आणि गायक ते संगीतकार अशा संघर्षमय प्रवासाची गोष्ट या सोहळ्यात सांगितली. या चित्रपटानंतर अनेक मोठे प्रोजेक्ट प्रस्तावित असून, माझे संगीत असलेल्या आगामी एका चित्रपटात आशाताईंनी दोन गाणी गायिली आहेत. त्यातील एक गाणे मी स्वतः आशाताईंसोबत गायले असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. विजय पगारे यांनी खूप मेहनतीने ‘बाय गो बाय’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे, हा चित्रपट सुपर डुपर बंपर हीट होणार असा विश्वास विजय गटलेवार यांनी व्यक्त केला.
दिग्दर्शक म्हणून ‘बाय गो बाय’ हा विजय पगारे यांचा पहिलाच चित्रपट आहे. त्याविषयी ते म्हणाले, ‘केदार शिंदे यांच्याकडे दोन चित्रपटांना सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यामुळे चांगला चित्रपट करण्याची पूर्वतयारी झाली. कधीतरी चित्रपट दिग्दर्शन करण्याचे स्वप्न होते. ‘बाय गो बाय’मुळे ते प्रत्यक्षात आले. स्त्री पुरुष समानता हवी असे फक्त बोलले जाते. मात्र, ही प्रत्यक्षातही यायला हवी. कोणावरही अन्याय झाला, तर त्याचे परिणामही अन्यायकारक होतात. असे भाष्य या चित्रपटात विनोदी पद्धतीने करण्यात आले आहे. प्रासंगिक विनोद हे या चित्रपटाचे बलस्थान आहे.’
प्रदीप कचेर पाटील व नरेश गणपत ठाकूर यांनी त्यांच्या मुलींच्या नावातील अक्षरावरून ‘आर. एस. सिनेव्हिजन’ ही चित्रपट निर्माती संस्था स्थापन केली आहे. या चित्रपटांसाठी सुबोध फाटक व सुबोध पवार यांनी गीतलेखन केले असून, विजय गटलेवार यांनी ते संगीतबद्ध केले आहेत. परेश मांजरेकर यांनी संकलन, सलील अमृते यांनी पार्श्वसंगीत, नरेंद्र भगत व विशाल सावंत यांनी कला दिग्दर्शन, मीलन देसाई यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. तर, मयूर वैद्य, राजेश बिडवे, संतोष भांगरे यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे.
चित्रपटात निर्मिती सावंत, विजय पाटकर, नयन जाधव, शशिकांत केरकर, शीतल फाटक, जयवंत भालेकर यांच्यासह पूर्णिमा अहिरे केंडे, प्रशांत चौडप्पा, पूनम खैर, दीपक आलेगावकर, कृतिका तुळसकर, परी पिंपळे, मयूर पवार आदींच्या भूमिका आहेत.