मुंबईमध्ये होणार जेष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांचा सन्मान

या चित्रपट महोत्सवामध्ये जेष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांचा त्यांनी भारतीय चित्रसृष्टीस दिलेल्या योगदानाबद्द्ल शरद पवारांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सत्कार होणार आहे.
२२ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान चालणा-या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वहिदा रेहमान प्रमुख पाहुणे म्हणून तर अर्जेंटिनाचे प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक पाब्लो सिझर हे विशेष अतिथी म्हणून लाभणार आहेत. महोत्सवाची सुरूवात ‘ला बुका’ या डॅनियल सिपरी दिग्दर्शित इटालियन चित्रपटाने होणार आहे. या महोत्सवामध्ये जागतिक सिनेमा या प्रवर्गांतर्गत २२ सिनेमे, कॅलिडोस्कोप अंतर्गत १४ सिनेमे, लॅटिन अमेरिकेचे ६ सिनेमे, कॅंट्री फोकस अंतर्गत ६ सिनेमे, रेट्रो चित्रपटांतगर्त ५ भारतीय सिनेमे, ५ मराठी सिनेमे, हेक्टर बेवेकोचे ७ सिनेमे असे एकूण ६०-६५ चित्रपट दाखविले जाणार आहेत.
२५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘स्मिता पाटील स्मृती’ व्याख्यानाचे आयोजन केले आहे. या व्याख्यानात प्रसिध्द दिग्दर्शक महेश भट्ट मार्गदर्शन करणार आहेत. मास्टर लेक्चर अंतर्गत चित्रपटांच्या तांत्रिक अंगांची माहिती दिली जाईल. तसेच प्रेक्षकांच्या प्रतिक्रीया देखील नोंदविल्या जाणार आहेत. चित्रपटाचा ख-या अर्थाने कसा स्वाद घ्यावा आणि चित्रपटाची भाषा समजून घेण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी केले आहे.