ज्येष्ठ कलाकार वसंत वानखेडे यांच्या चित्रकृतींचे ‘कलेक्शन ऑफ रेट्रोस्पेक्टीव्ह वर्क्स’ हे चित्रप्रदर्शन ३ मार्चपासून मुंबईतील जहांगीर कलादालनात सुरु झाले असून ते ९ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे.
वसंत वानखेडे हे जीवनाचा खरा अर्थ समजणा-या आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने साजरे करणा-या लोकांपैकी एक आहेत. साधेपणाने या आनंदाचा शोध घेत दुर्लक्षित घटकांना धैर्याने त्यांनी आपल्या चित्रात जागा केली. त्यांना कला सादर करण्यासाठी कुठल्याही विशिष्ठ माध्यमाची गरज नाही. कला साकारण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा उपयोग करण्याकडे त्यांचा कल असतो.वसंत वानखेडे यांच्या कुठल्याही चित्रकृतीवर त्यांची सही आपल्याला आढळणार नाही. त्यांची ही अनुपस्थितीच त्यांच्या अस्तित्वाची जाणीव अधिक करून देते.
वसंत वानखेडे यांनी स्वतःची दृष्टी, श्वास, मेहनत, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ, आनंद व दु:ख आपल्या कलेसाठी समर्पित केले. आपल्या आई-वडिलांकडून मिळालेल्या वसंत वानखेडे या नावाला त्यांच्या कलाकृतींनी जगामध्ये वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
जीवनात ब-याच वेळेस आपण एखाद्या शांत व्यक्तिमत्वाने प्रेरित का होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे वसंत वानखेडे याचं व्यक्तिमत्व. या व्यक्तीला भेटल्यावर मला आणि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना हाच अनुभव आला.
वसंत वानखेडे यांच्यासारख्याचे मार्गदर्शन आम्हाला लाभले याबद्दल आम्ही स्वत:ला खूप भाग्यवान समजतो तसेच त्यांच्या या चित्राकृती ३ मार्च रोजी जहांगीर आर्ट गॅलरी येथे सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, असे आर्ट एन्ड सोल गॅलरीच्या तरणा खुबचन्दानी यांनी सांगितले.
