येवला येथील कारागिरीचे ५ दिवसीय प्रदर्शन
येवला येथील कारागिरांच्या पैठणीला थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणारा २७ वा ‘न्यू वेव्ह पैठणी फेस्टिवल’ १९ ते २३ ऑक्टोंबर दरम्यान स्काउट हॉल, शिवाजी पार्क दादर येथे होणार आहे.
साड्यांची महाराणी म्हणजे पैठणी. पैठणी हा मराठी स्रियांच्या जिव्हाळ्याच्या विषय आहे. आपल्या कपाटात एकतरी पैठणी असावी हे प्रत्येक महिलेला वाटत असत. जगप्रसिद्ध पैठणी साडी तयार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या रेशमी, जर, चांदी व कारागिरांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पैठणी साड्यांच्या किंमती दिवसेंदिवस सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.
येवला, संभाजी नगर येथील कारागिरांना पैठणीकरता थेट बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल. हाच विचार करून १९८९ साली स्व. सरोज धनंजय यांनी पैठणीचे माहेरघर असलेल्या येवला येथून अस्सल हातमागाच्या विणकाम केलेल्या पैठणी साड्या प्रायोगिक तत्वावर मुंबईमध्ये आणून एक वार्षिक प्रदर्शन भरवले होते आणि तिथपासून या पैठणी प्रदर्शनाला सुरवात होत गेली आणि हे प्रदर्शन दरवर्षी भरवले जाते.
‘एवढ्या वर्षानंतरसुद्धा न्यू वेव्ह पैठिणी फेस्टिवलबद्दल लोकांमध्ये आकर्षण वाढत आहे. हे २७ वर्षेसुद्धा अपवाद नाही. पैठणी साडी ही एका रात्रीत तयार होत नाही तर त्यासाठी खूप वेळ लागतो. आकर्षक आणि भरजरी पैठणी तयार करण्यासाठी सुमारे सहा महिने ते एक वर्ष कालावधीसुद्धा लागतो आणि त्यासाठी हजारो कारागीर मेहनत घेत असतात. आज सरासरी एक साडी तयार करताना त्यामध्ये २००-३५० ग्रॅम जरी, ७०० ग्रॅम रेशीम यांचा वापर करतात. त्यामुळे साधारण एका साडीचे एकूण वजन ८००-९०० ग्रॅम होते. एक- एक रेशीम, जरी धागा विणून हातमागाने फॅब्रिक, रचना, डिझाईन्स आणि रंगसंगती जुळवून पैठणी साडी तयार होत असते. साडीप्रेमींना कळावे की एक अस्सल आणि भरजरी पैठणी साडी तयार होण्यासाठी कशी आणि किती मेहनत घ्यावी लागते, यासाठी आम्ही ह्यावर्षी काही पैठणीची कार्यशाळा तसेच डेमो आयोजन प्रदर्शनाच्या ५ दिवसांमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी येवला येथून खास कारागीर येणार आहेत,’ असे न्यू वेव्ह पैठणी फेस्टिवलच्या संचालिका सन्निधा भिडे यांनी सांगितले.
फॅशन डिझायनरचे विद्यार्थी, आणि ग्राहकांसाठीसुद्धा ही एक संधी असणार आहे. फॅशन उद्योग स्थिर नाही. गिरणीमध्ये तयार केलेले धाग्यांपासूनचे कपडे, हातमाग कापड यामध्ये सतत परिवर्तन, रचना इनपुट आणि सुलभीकरण आवश्यक आहे. ‘व्यावसायिक आणि विद्यार्थी यांना ही एक संधी आहे की त्यांनी शिकावे की एक पैठणी साडी विणणे हे किती कठीण काम आहे’, असेही सन्निधा भिडे सांगतात.
या प्रदर्शनासोबत प्रसिद्ध टेक्सटाईल डिझायनर अनुजा साने यांचे हँडलूम आणि टेक्सटाईल उद्योगासंबंधित इंस्टॅालेशन समाविष्ट असणार आहे. यामुळे प्रदर्शनाला येणाऱ्या वर्गाला कापडामध्ये असलेले विविध रंग आणि त्यातील धाग्याची जाडी याविषयी उत्तम मार्गदर्शन होईल. तसेच त्याद्वारे पैठणीमध्ये वापरले जाणारे रंग आणि त्यातील धागे याविषयी देखील माहिती मिळेल.
वर्षात न्यू व्हेव पैठणीमध्ये फार बदल होत गेले आहेत. पैठणी प्रदर्शन हे आता फक्त एक प्रदर्शन राहिले नसून रंग, डिझाईन, क्लिष्ट काम यामुळे तो एक महोत्सव झाला आहे. आज हा वार्षिक कार्यक्रम मुंबई मध्ये एक ५ दिवसांचा फार मोठा सण झाला आहे, जेथे २५० हून अधिक अस्सल पारंपारिक आणि डिझाईनर साड्या आपल्याला एकाच ठिकाणी पहावयास मिळतात. येथील कारागीर वर्षभर या साड्यांवर कारागिरी करत असतात. प्रदर्शनात पैठणीच्या पारंपारिक रंगांबरोबर नव्याने काही रंगांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पैठणीवरील नेहमीच्या डिझाईनपेक्षा वेगळी डिझाईन असलेल्या साड्यांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे. उदाहरणार्थ: तारा, नारळी, रुई फूल, पंख, पोपट-मैना, चंद्रकोर, कळस पाकळी, नागमोडी, कमळ, भौमितिक रचना इत्यादी. येथे ७५०० रुपयांपासून ते २. ५ लाखापर्यंतची पैठणी आपल्याला पहावयास मिळेल. पाच दिवसांच्या पैठणी प्रदर्शनात नेहमीप्रमाणे सर्व राज्यांतील वैविध्यपूर्ण साड्या जसे माहेश्वरी, चंदेरी, कांथा, इरकल, टस्सर, कोसा, काश्मिरी, कोलकत्ता, ओरिसा, पुणा साड्या इत्यादी अनेक प्रकारच्या साड्या, पैठणीचे ड्रेसेस, ड्रेस मटेरीअल, दुपट्टा, स्कार्फ , सेमीप्रेशियस स्टोन ज्वेलरी, हँडमेड बॅग्स असे विविध प्रकारचे ४० स्टॉल असतील. तसेच बचत गटांचे २० वेगवेगळे स्टॉलसुद्धा या पैठणी फेस्टमध्ये असणार आहेत.