दाक्षिणात्य तडका असलेल्या सिनेमाचा मुहूर्त संपन्न
धमाल कौटुंबिक विनोदी शैलीतून जोडले जाणारे भावबंध मांडणाऱ्या ‘व्हेंटिलेटर’ची निर्मिती केल्यानंतर प्रियंका चोप्रा आता ‘काय रे रास्कला…’ या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांना मनमुराद हसवणार आहे.
नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. यावेळी निर्मात्या डॉ. मधु चोप्रा, चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीधरन स्वामी यांच्यासह चित्रपटातील कलाकारही उपस्थित होते. त्याशिवाय चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या कुनिका सदानंदही यावेळी उपस्थित होत्या. ‘काय रे रास्कला’ या चित्रपटासाठी कार्यकारी निर्मातीची भूमिका कुनिका सदानंद साकारत आहेत.
आपली प्रत्येक कलाकृती ही तितकीच सक्षम असावी आणि आपल्या शुभेच्छा त्या प्रत्येक गोष्टीला मिळाव्या यासाठी प्रियंका नेहमीच आग्रही असते. नुकत्याच पार पडलेल्या या मुहूर्तावेळी प्रियंका चोप्रा स्वत: उपस्थित राहू शकली नसली तरी विडीयोद्वारे तिने ‘काय रे रास्कला’च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. हा चित्रपटही प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित ‘काय रे रास्कला’ चित्रपटाची निर्मिती प्रियंका चोप्रा आणि डॉ. मधु चोप्रा यांनी केली असून संगीता स्वामी आणि डॉ. सत्यशील बिरदार या चित्रपटाचे सह–निर्माते आहेत.
या चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरूवात झाली असून, नावातच दाक्षिणात्य तडका असलेला ‘काय रे रास्कला…’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शनासाठी सज्ज होणार आहे…