२१, २२ आणि २३ एप्रिलला आयोजन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ‘९७ वे अ.भा. मराठी नाट्य संमेलन’ दिनांक २१, २२ आणि २३ एप्रिल २०१७ रोजी उस्मानाबाद येथे नियोजित संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या संमेलनाचा लोगो ११ एप्रिलला प्रसिद्ध झाला.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुजितसिंह ठाकूर असून या सोहळ्यात भरगच्च करमणुकीचे कार्यक्रम, नाटके, एकपात्री, एकांकिका आणि स्थानिक शाखेचे कार्यक्रम तीन रंगमंचांवर सादर करण्यात येणार आहेत.
आर.पी. कॉलेज रंगमंचाच्या उभारणीचे काम सुरु असून छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरु आहे.
या संमेलनाचा ‘उद्घाटन सोहळा’ दिनांक २१ एप्रिल २०१७ रोजी सायं. ६.३० वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार असून उस्मानाबादचे पालकमंत्री, तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते तसेच दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘समारोप सोहळा’ २३ एप्रिल २०१७ रोजी सायं ५.३० वाजता संपन्न होणार आहे. समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘तुझं आहे तुजपाशी’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे. तसेच ‘षड्यंत्र’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘नक्षत्रांचे देणे’ हे कार्यक्रमही संपन्न होतील.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दिनांक २२ एप्रिल रोजी संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे.
दिनांक १६ एप्रिल २०१७ ते २० एप्रिल २०१७ या कालावधीत ‘नाट्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून त्यात ‘ऑल दि बेस्ट’, ‘हसवा फसवी’, ‘पारंपारिक लावणी’, ‘नटरंगी नार’, ‘तुम्हीच माझे बाजीराव’, ‘के दिल अभी भरा नही ’ इत्यादि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
नाट्य संमेलनात महाराष्ट्रातील विविध लोककला सादर करण्यात येणार आहेत. संमेलनाला रंगभूमीवरील नामवंत कलावंत उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या आयोजनाची तयारी जोरात सुरु असून तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे ६८,००० स्क्वेअर फुटांवर मंडपाचे आणि ४००० स्क्वेअर फुटांच्या रंगमंचाचे काम सुरु आहे. शहरातील चौकांच्या शुशोभीकरणाचे काम सुरु असून स्थानिक कार्यक्रमांच्या आयोजनाचे काम सुरु आहे. तसेच कलावंत, प्रतिनिधी इत्यादिसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. उस्मानाबाद येथे प्रथमच नाट्य संमेलन संपन्न होत असल्यामुळे स्थानिक कलावंत आणि रसिक प्रेक्षक प्रचंड उत्साहात आहेत.