प्रथम स्मृतीदिनी ‘सारे संगीतकार’
या गाण्याचे गीतकार आदित्य दवणे हे सुप्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांचे सुपुत्र असून स्वरूप नंदू होनप यांच्यासह ते देखील गीतकाराच्या रूपाने प्रथमच संगीतसृष्टीत पदार्पण करत आहेत.
संगीतकार स्वरूप नंदू होनप यांनी मराठी संगीतसृष्टीतील आठ दिग्गज संगीतकार या गाण्याच्या निमित्ताने गायकाच्या भूमिकेतून एकत्र आणले आहेत. प्रत्येक संगीतकाराच्या अंगाने जाणारी चाल आणि शब्द बांधून विविध शैलीतील या आठ कडव्यांच्या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. या गाण्यामध्ये पं.यशवंत देव, पं.अजित कडकडे, अशोक पत्की, सुरेश वाडकर, श्रीधर फडके, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, निलेश मोहरीर अशा आठ मातब्बर संगीतकारांचा गायक म्हणून सहभाग आहे. या गाण्यामध्ये ग्रुप व्हायोलीनस्, सितार, तबला, मेंडोलीन अशा अॅकॅास्टिक वाद्यांचाही वापर करण्यात आला आहे. या गाण्याचे संगीत-संयोजन सुराज साठे व ताल संयोजन प्रमोद साने यांनी केले आहे. तसेच पं.उमाशंकर शुक्ला, माधव पवार, जितेंद्र जावडा आणि ग्रुप व्हायोलीनस्, विलास जोगळेकर, ज्ञानेश देव, विजय जाधव, प्रभाकर मोरे, राज शर्मा, अशोक वोरा, बिनॅाय सिंग, रोहन चवाथे, रॅानी सातमकर अशा मातब्बर वादकांचा या गाण्यास हातभार लागला आहे. ध्वनिमुद्रण अवधूत वाडकर यांनी (आजीवासन साऊंड्स) येथे केले आहे. या गाण्याच्या रूपाने केवळ संगीतावर आधारित, स्वतः संगीतकारांनी गायलेले बहुदा पहिले गाणे साकारले जाणार आहे. १८ सप्टेंबर २०१७ रोजी यु ट्यूबवर या गाण्याचे अनावरण “SNH MUSIC” नामक चॅनलवर होईल आणि रसिकांसाठी हे गाणे खुले होईल.
स्वर्गीय संगीतकार नंदू होनप यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी म्हणजेच १८ सप्टेंबर २०१७ रोजी ‘सारे संगीतकार’ या ऐतिहासिक गाण्याचा जन्म होतोय.
वडिलांना या गाण्याच्या माध्यमातून सुरांजली अर्पण करावी असा मानस नंदू होनप यांचे सुपुत्र स्वरूप नंदू होनप यांचा आहे. यानिमित्ताने एक अनोखी संकल्पना घेऊन ते एक अभिनव कलाकृती संगीतकाराच्या भूमिकेतून रसिकांसाठी सादर करणार आहेत.


गाण्याचे संगीतकार आणि निर्माते स्वरूप नंदू होनप हे गाणे जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचेल अशी आशा व्यक्त करताना, ‘हे गाणे संगीतसृष्टीत काम करणाऱ्या, तसेच संगीतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे आहे’ असे म्हणतात. संगीतकार स्वरूप नंदू होनप आणि गीतकार आदित्य दवणे ही जोडी भविष्यात अनेक दर्जेदार गाण्यांची निर्मिती करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे आणि या जोडीला उज्वल भविष्याकरिता संगीतसृष्टीतील अनेक थोरामोठ्यांकडून शुभेच्छा आणि आशिर्वाद मिळत आहेत.
संपर्क – संगीतकार स्वरूप नंदू होनप : ९८२१५५४५१८