चित्रपट २० एप्रिलला प्रदर्शित होणार
२० एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘शिकारी’ या चित्रपटाच्या अनेक वैशिष्ट्यांबरोबरच आणखी एक म्हणजे या चित्रपटाचे सरप्राईज पॅकेज मृण्मयी देशपांडे जी ह्या चित्रपटांत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

एकीकडे उनाड अवखळ अदांनी धमाल उडवलीय तर दुसरीकडे शृंगारिक प्रसंग साकारताना मादक दिसणं काय असतं हे सुद्धा दाखवून दिलं. चित्रपटसृष्टीला लाभलेल्या गुणी अभिनेत्री जेव्हा मनोरंजनप्रधान सिनेमात आपलं नाणं वाजवून दाखवतात तेव्हा त्यांना सिनेमाच्या पडद्यावर पाहण हा एक अनुभव असतो आणि तो मृण्मयी ह्या सिनेमात नक्कीच देते असे शिकारी चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी सांगितले.
‘शिकारी काम करताना करताना मला मजा आली. आतापर्यंत मी पडद्यावर ज्या भूमिका केल्या आहेत, त्यापेक्षा ही वेगळी भूमिका आहे. माझी जी वेगळी इमेज आहे त्यापेक्षा या रोलमध्ये वेगळेपण होते म्हणून मी हा रोल निवडला’. असे मृण्मयी देशपांडे हिने सांगितले.
ती पुढे म्हणाली की ‘महेश मांजरेकर आणि विजू माने यांच्यामुळेच मी या चित्रपटात आले. महेश मांजरेकर सरांनी मला जेव्हा या रोलविषयी विचारलं तेव्हा मी त्यांना नाही म्हणू शकले नाही’.
‘शिकारी चित्रपटातील तिच्या रोलविषयी विचारल्यावर मृण्मयी देशपांडे म्हणाली की ‘या चित्रपटात स्त्रीच्या निरागस जीवनात अचानक अश्या अनेक गोष्टी घडतात, त्याचा ती सामना कसा करते, हे सगळे तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल’.
महेश मांजरेकर यांचे सादरीकरण असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आघाडीचे दिग्दर्शक विजू माने करत आहेत. या चित्रपटाची बोल्ड पोस्टर्स सर्वत्र झळकली आणि या चित्रपटाची चर्चा सुरु झाली. ‘अ लाफ रायट, अ सेक्स कॉमेडी विथ अ मेसेज’ असे ब्रीदवाक्य घेवून ही पोस्टर्स झळकली आहेत. नेहा खान हिची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहे, तर तेवढीच महत्वाची भूमिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’फेम सुव्रत जोशीने यात साकारली आहे. त्यांच्याबरोबर भालचंद्र कदम, भरत गणेशपुरे आणि वैभव मांगले, कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका यात आहे.