राज्य नाटय़ स्पर्धेत गोव्याच्या श्री थिएटर्सचे सादरीकरण
रेल्वे कारशेडमध्ये लागलेली मालगाडी. त्या गाडीची बोगी फोडून त्यातील माल लंपास करायचा आणि झोपडपट्टीतील गोरगरिबांना, अडलेल्यांना देऊन त्यांचा संसार सावरायचा. हे काम करणाऱ्या नायकाचे नाव आहे ‘गुरू’. गरिबांचे सोशन करणाऱ्या भाईगिरीशी लढणाऱ्या या परोपकारी ‘गुरू’च्या जगण्याची गोष्ट गोव्यातील आसगावच्या श्री थिएटर्सने रेखाटली.
छायाचित्रे : निखिल गोडसे
राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत शनिवारी रमेश पवार लिखित आणि गजानन शेट नार्वेकर दिग्दर्शित ‘गुरू’ या नाटकाचा प्रयोग शनिवारी पनवेलच्या आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहातसादर करण्यात आला.
रेल्वेबोगी रंगमंचावर हुबेहुब साकारून नेपथ्यकार सुखदा मराठेचे कौशल्य नाटकाच्या सुरुवतीलाच अधोरेखित करणारे ठरले. त्या नेपथ्याला विकास चोपडेकर यांच्या पार्श्वसंगीताने आणि विजय रेमजे यांच्या प्रकाशयोजनेने परिणामकारक साथ देत नाटकाचे वास्तववादी चित्र रेखाटण्यास मोलाची मदत केली.
शीर्षकांकित गुरूची भूमिका नाटकाचे दिग्दर्शक गजानन शेट नार्वेकर यांनी स्व:ता साकारली. गुरूचे सहकारी मित्र बाबू (यतीश साळगावकर) आणि मास्तर(किशोर कळंगुटकर) या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलावंतांनीही त्याला यथोचित साथ दिली. गुरूवर निव्र्याय प्रेम करणाऱ्या शकुलीची भूमिका साकारणाऱ्या सम्राज्ञी मराठे यांनी त्या व्यक्तिरेखेत असणारे बारकावे टिपत आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले. त्यांच्यासोबतच सुखदा मराठे यांनी साकारलेल्या बेबलीसह साबा च्यारी (शंकर), रोहन साळगावकर (चमच), रामदास कानुलकर (शांतू), उदय मडगावकर (हवालदार), ज्ञानेश्वर पेडणेकर (ज्योतिषी), साईनाथ साळगावकर (बाबा), विष्णू मांद्रेकर (अब्दुल्ला), अमन साळगावकर (इन्स्पेक्टर) यांनी आपापल्या भूमिका समर्थपणे साकारल्या. सम्रज्ञी मराठे यांची वेशभूषा आणि निलेश वेर्णेकर यांची रंगभूषा नाटकाला सहाय्यभूत ठरली.
नाटकाचा काळ दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती रंगकर्मी आपल्या कलाकृतीत करत असतात. या नाटकात तो काळ दाखवण्यासाठी हिंदी चित्रपटांचे पोस्टर्स, राजेश खन्ना यांचा जनसामान्यांच्या मनावर असलेला पगडा, असे काही सदर्भ देऊन नाटकाचा काळ अधोरेखित करण्यात आला.