१९ ऑक्टोबरला ‘हवा येऊ द्या’मध्ये!
भाऊराव क-हाडे दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘ख्वाडा’ या चित्रपटाचे कलावंत १९ ऑक्टोबरला रात्री ९.३० वाजता झी मराठीच्या प्रसिद्ध ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात दिसणार आहेत. ख्वाडा हा चित्रपट येत्या २२ ऑक्टोबरला चित्रपगृहात दाखल होणार असून, या चित्रपटाची टीम ‘चला हवा येऊ द्या’द्वारे घराघरात पोहोचणार आहे.
‘ख्वाडा’ चित्रपटावर ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘स्पेशल ज्युरी मेंशन’ आणि ‘सिंक साऊंड’ अश्या दोन राष्ट्रीय पुरस्कारांची मोहोर उमटली आहे. यांशिवाय उत्कृष्ट पदार्पण निर्मिती, उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शक, उत्कृष्ट रंगभूषा असे ५ राज्य पुरस्कार मिळाले असून, २०१५च्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कारही मिळाला आहे. यांशिवाय उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट पदार्पण (अभिनेता), उत्कृष्ट खलनायक असे ‘प्रभात २०१५’ चार पुरस्कार मिळाले आहेत
चित्रपटात मुख्य भूमिका शशांक शेंडे साकारत असून, भाऊसाहेब शिंदे हा नवीन, डॅशिंग आणि तरुण चेहरा या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करीत आहे. यांशिवाय योगेश डिंबळे, रसिका चव्हाण, वैष्णवी ढोरे, चंद्रकांत धुमाळ, प्रशांत इंगळे, वैशाली केंदळे, अमोल थोरात, नाना मोरे, हेमंत कदम आणि सुरेखा यांनी विशेष भूमिका साकारल्या आहेत. वीरधवल पाटील यांनी छायाचित्रण केले असून, संकलन रोहन पाटील यांनी, तर संदीप इनामके यांनी कला दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातील गीत विनायक पवार यांनी लिहिले असून, संगीत रोहित नागभिडे यांनी, तर ध्वनी संयोजन महावीर सबनवार यांनी केले आहे. चंद्रकांत राऊत सहनिर्माते असून, मंगेश जोंधळे कार्यकारी निर्माते आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण अहमदनगर येथे करण्यात आले असून, अतिशय वेगळ्या पद्धतीने दिग्दर्शित करण्यात आलेला आणि संगीत संयोजनाचा उत्कृष्ट मिलाफ असलेला ‘ख्वाडा’ २२ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांच्या भेटीला येणार आहे.