जीवन, निसर्ग आणि त्याचे अद्भूत चमत्कार
मुंबईतील विख्यात रंगलेखक सतीश गुडेकर यांनी अलिकडे साकारलेल्या चित्रांचं प्रदर्शन आर्टीस्ट सेंटर आर्ट गॅलरी, ऍडोर हाऊस, पहिला मजला, ६ के. दुभाष मार्ग, काळा घोडा, मुंबई येथे २६ ऑक्टोबरपासून सुरु झाले असून ते १ नोहेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
सदर चित्रमालिका जीवन, निसर्ग आणि त्याचे अद्भूत चमत्कार यांचा मागोवा घेणारी असून, कलात्मक रचना आणि सय्यमीत रंगसंगतीमुळे तिला आध्यात्मिक पार्श्वभूमी आणि सकारात्मक भाव प्राप्त झाला आहे. विविध बिंदू, वर्तूळं, चौकोन, रेषा यांच्या कलात्मक वापर करून सतीश गुडेकर यांनी या चित्रांमधून एक अनोखा दृष्य परिणाम साधला आहे. ही चित्रं साकार करताना छया-प्रकाश, रंग छटा यांचा तोल साधलेला पाहून कुंचल्यावर चित्रकाराचं असलेलं प्रभूत्व, कौशल्य आणि हातोटी यांचा दर्शकाला प्रत्यय येतो.
सतीश गुडेकर यांनी बॅचलर ऑफ फाईन आर्टची पदवी वांद्रे, मुंबई येथील एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट येथून संपादन केली. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामधून अनेक एकल आणि समूह प्रदर्शनात आपली कला रसिकांसमोर मांडली आहे. सतीश गुडेकर हे सर्जनशील कलाकार असून साध्या भौमितीक रचनांचा वापर करून राखाडी रंगाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट परिमाण आणि खोली प्रदान करणारी चित्रं त्यानी साकार केली आहेत.विभिन्न पोत, मर्यादित रंग, मुक्त आकार संयोजन आणि रिकामी सोडलेली जागा हे त्यांच्या या कलाकृतींचं वैषिष्ट्य म्हणता येईल.