जागृती पालक संस्थेच्या मुलांसोबत ‘ख्रिसमस सेलिब्रेशन’
‘करार’ सिनेमाच्या क्रांती रेडकर आणि उर्मिला कानेटकर या दोन प्रमुख अभिनेत्रींनी नुकत्याच ठाण्यातील जागृती पालक संस्थेतील विशेष मुलांसह ख्रिसमस सेलीब्रेट केला. निरागस आणि अल्लड असणाऱ्या या विशेष मुलांच्या सानिध्यात या दोघींनी नाताळ सणांचा मनसोक्त आनंद लुटत, या मुलांचे भरपूर लाड देखील केले.
आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी माणसांनी आपणहून अनेक बंधने स्वतःवर लादून घेतली आहेत. या बंधनामुळे आयुष्यात एकसूत्रीपणा आला खरा! मात्र भावनिक नातेसंबंधांवर त्याचा मोठा परिणामदेखील झाला असल्याचे पाहायला मिळते. आधुनिकतेच्या जगात दुरावणाऱ्या नातेसंबंधांमध्ये पालकत्वाचादेखील महत्वाचा मुद्दा येतो. आजची ‘वर्कहोलिक’ पिढी हे पालकत्व सहजासहजी स्वीकारत नाही. अशा या भावनाशुन्य समाजाला नातेसंबंधांची अनोखी शिकवण देणारा ‘करार’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मातृत्वाचा अनोखा ‘करार’ दाखवणाऱ्या या सिनेमातील प्रमुख अभिनेत्री असलेल्या क्रांती रेडकर आणि उर्मिला कानेटकर या दोघींनी विशेष मुलांसोबत तसेच त्यांच्या पालकांसोबत संवाद साधला. पालकत्वाची जबाबदारी खूप मोठी असून, आयुष्यात प्रत्येकाला ही जबाबदारी स्वीकारता आली पाहिजे, असे संदेश देत या दोघींनी या मुलांसोबत पालकत्वाचा अनोखा ‘करार’ देखील केला.
आज अनेक दाम्पत्य भविष्याच्या तरतुदीसाठी संततीचा विचार करताना दिसत नाही. तसेच कोणत्याही वैद्यकीय सल्ल्यांशिवाय कुटुंबनियोजनाची घरगुती उपाययोजना करताना दिसतात. अशावेळी त्यांना भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांचा उहापोह आगामी ‘करार’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. पुढील वर्षात १३ जानेवारी रोजी प्रदर्शित होणा-या या सिनेमाचे मनोज कोटियन यांनी दिग्दर्शन केले असून क्रेक इंटरटेंटमेन्टच्या पूनम सिव्हिया आणि नीलम सिव्हिया यांनी निर्मिती केली आहे. परेश दवे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. आपल्या अभिनयाबरोबरच सामाजिक संदेश लोकांपर्यंत पाहोचवण्यास नेहमी तत्पर असलेला सुबोध भावे यात मध्यवर्ती भूमिकेत दिसून येणार आहे.