लाल मातीतल्या कुस्तीची रग १५ जुलैला सिनेमागृहांत
महाराष्ट्राच्या लाल मातीतील कुस्तीची रग अधोरेखित करणाऱ्या ‘तालीम’ या चित्रपटाच्या संगीत प्रकाशनाचा सोहळा सोमवारी मुंबईत ऑर्किड हॉटेल येथे रंगला. बऱ्याच बॉलिवूडपटांचे यशस्वी संकलन केल्यानंतर थेट मराठीत दिग्दर्शनाकडे वळलेल्या नितीन मधुकर रोकडे यांच्या ‘तालीम’ या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा कुस्तीचे डावपेच पाहायला मिळणार आहेत.

‘तालीम’मध्ये एकूण ५ गीतांचा समावेश असून, सध्याचा आघाडीचा गीतकार मंदार चोळकर याने ही गीते लिहिली आहेत. संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर यांनी या गीतांना संगीत दिले आहे.
‘तालीम रंगू दे…’ हे शीर्षक गीत आदर्श शिंदे आणि तरन्नुम मलिक यांनी गायलं आहे. ‘इश्काचा बाण सुटला…’ ही धडाकेबाज लावणी रोंकणी गुप्ता आणि स्वप्निल गोडबोले यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आली आहे. ‘कळा ना यो कळा ना …’ हे विरहगीत दिव्यकुमार आणि कल्पना पोटवरी यांनी तर ‘रंगात रंग वेगळा…’ हे प्रेमगीत आनंदी जोशी आणि फरहाद भिवंडीवाला यांनी गायलं आहे. ‘बे एके बे…’ हे धम्माल गीत या चित्रपटात दोनदा दिसणार असून अनुक्रमे अभिरूप तसेच स्वप्निल गोडबोले यांनी हे गाणं गायलं आहे.
मंदार चोळकरच्या लेखणीतून आकाराला आलेल्या या गीतांना संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर याने अप्रतिम स्वरसाज चढवला आहे. ‘तालीम’च्या माध्यमातून कुस्तीचं पुनरागमन होत असलं तरी या चित्रपटात जीवनातील सर्व रंग पाहायला मिळणार असल्याचं मत दिग्दर्शक नितीन रोकडे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, हा चित्रपट केवळ कुस्तीवर आधारित नाही, यात एक सशक्त कथानकही आहे, जो रसिकांना खिळवून ठेवेल. त्याला सुमधुर गीत-संगीताची जोड देण्यात आलेली आहे. चित्रपटाच्या कथेची गरज ओळखून त्यात गाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यातील प्रत्येक गाणे कथानकाशी एकरूप होणारं असून चित्रपटाची गती वाढवणारं आहे. गीतकार मंदार चोळकरने अतिशय मार्मिक शब्दांमध्ये चित्रपटातील अचूक भाव शब्दांद्वारे गीतात व्यक्त केले आहेत. त्यावर संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर याने कान तृप्त करणारं संगीत दिलं आहे. आजच्या तरूणाईसोबतच प्रत्येक वयोगटातील संगीतप्रेमींना ‘तालीम’मधील गीते नक्कीच आवडतील. मराठी आणि हिंदीतील आघाडीच्या गायकांच्या आवाजात ‘तालीम’मधील गीतरचना ऐकताना रसिकांना एका वेगळाच आनंद मिळेल यात शंका नाही.
‘तालीम’मध्ये अभिजीत श्वेतचंद्र, वैशाली दाभाडे, मिताली जगताप, विष्णू जोशीलकर, छाया कदम, प्रशांत मोहिते, यशपाल सारनाथ, अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शन आणि संकलनाबरोबरच या चित्रपटाची कथा-पटकथा नितीन मधुकर रोकडे यांनी लिहिली असून सिकंदर सय्यद, अभिजीत कुलकर्णी आणि नितीन रोकडे यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. फारूख खान या चित्रपटाचे केमेरामन आहेत.
‘तालीम’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण भोर, जुन्नर, कुंडल-सांगली येथे पूर्ण करण्यात आलं असून येत्या १५ जुलैला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.