निखिल घोडके यांच्या कलाकृतींचे २ जुलैपासून प्रदर्शन

मूळचे ठाणेकर असलेले छयाचित्रकार निखिल घोडके हे सध्या न्यूयॉर्कजवळील मॅनहॅटनविल महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांनी काढलेली छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार असून, २ जुलैला सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे निवृत्त चीफ आर्किटेक्ट वि. रा. अत्रे यांच्या हस्ते कलाभवन, कापूरबावडी, बिगबझारजवळ, ठाणे पश्चिम येथे करण्यात येणार आहे.
निखिल घोडके न्यूयॉर्कजवळील मॅनहॅटनविल महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. ते चित्रपट व दूरचित्रवाणीशी संबंधित असलेले विविध तांत्रिक विषय अमेरिकेत शिकवतात. अध्यापनाबरोबरच कलादिग्दर्शनाच्या विविध जबाबदा-या त्यांनी अमेरिका आणि न्यूझीलंडमध्ये कुशलतेने सांभाळलेल्या आहेत. भारतातही ए. बी. पी. न्यूज व नेटवर्क १८ या समुहाबरोबर त्यांनी कामे केलेली आहेत.

या चित्रप्रतिमा ताज्या ठसठशीत आहेत. रुढ चित्रणापेक्षा त्यांचे हे चित्रण थोडेसे वेगळॆ आहे. पर्यटकांच्या नजरेपेक्षा त्यांना काहीतरी जास्त जाणवते व ते आपल्या कॅमेऱ्याने नेमका तो वेगळेपणाच टिपतात, हे या प्रदर्शनात जाणवेल.

निखिलच्या मते ‘जेव्हा तुम्ही एका व्यक्तीच्या छायाचित्राजवळ एक महागडी कार दाखवता, तेव्हा ते एक यशस्वी आणि श्रीमंत व्यक्तीची प्रतिमा मानली जाते. जेव्हा व्यक्तीशेजारी मोडकी स्कुटर असेल, तेव्हा ते सर्वसामान्य व्यक्तीचे चित्र वाटते. ही तुलना, रसिकांना आनंदाबरोबर विचार करण्यास प्रवृत्त करणे हाच ‘कनेक्शन’चा मुख्य हेतू आहे.’
प्रदर्शन स्थळ : कलाभवन, कापूरबावडी, बिगबझार जवळ, ठाणे पश्चिम
प्रदर्शन कालावधी : दिनांक २ ते ४ जुलै २०१६
वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ७