नेहरू सेंटर कला दालनात अनोख्या शैलीतील भावपूर्ण कलाकृती
कर्नाटकातील बंगळूरस्थित प्रसिद्ध चित्रकर्ती सुनीता देशपांडे यराडी यांच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये २६ मेपासून सुरू झाले असून ते रसिकांना १ जूनपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पहायला मिळणार आहे.
चित्रकर्ती सुनीता देशपांडे यराडी यांचे कलाशिक्षण शरण बसवेश्वर विद्यापीठ, गुलबर्गा येथे झाले व कलेतील पदव्युत्तर पदवी त्यांनी मिळवली. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी विविध कलादालनात सादर केलेल्या एकल व सामूहिक कला प्रदर्शंनांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण चित्रे अनेक मान्यवर कलासंग्रहाकडे असून कलाक्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवला आहे.
चित्रकर्ती सुनीता देशपांडे यराडी यांनी प्रदर्शनात आपल्या अनोख्या शैलीत भावपूर्ण चित्रे साकारली आहेत. स्त्री मनातील विविध भावनांचे पैलू त्यांनी अतिशय आकर्षकरित्या आपल्या चित्रात मांडले आहेत. निसर्ग व मानव विशेषत: स्त्री आणि तीच्या मानसिक संवेदना ह्यातील अतूट नाते दर्शविताना सुनीता देशपांडे यांनी आई व मूल ह्यातील भावनिक स्नेहबंध, मानवी सहजीवनातील मानसिक ओढ व आसक्ती, प्रेम, माया, ममता आदी भावनांचे मनोज्ञ दर्शन आपल्या उत्तम चित्रमाध्यमातून सर्व रसिकांना घडवले आहे.