सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची अपेक्षा
कोकणामध्ये पर्यटनाचा विकास अधिक प्रभावी आणि उत्तम होण्याच्या दृष्टीने कोकणातील उद्योजकांनी पर्यटनाच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्याचा मास्टर प्लॅन तयार करावा, यासाठी शासन स्तरावर जे सहकार्य आवश्यक आहे ते आपण नक्कीच करु, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी दिले.
कोकण पर्यटन उद्योग संघ आयोजित कोकण पर्यटन व्हिजन परिषदेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते २७ सप्टेंबरला झाले. याप्रसंगी बंदरे विकास राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग संघाचे अध्यक्ष माधव भंडारी, आमदार भाई जगताप, माजी आमदार प्रमोद जठार आदि मान्यवर उपस्थित होते.
केरळला लाभलेल्या निसर्ग सौंदर्याच्या वरदानामुळे केरळचे पर्यटन उत्तम प्रकारे विकसित झाले. याच धर्तीवर कोकणाचा विकास व्हावा अशी अपेक्षा तावडे यांनी व्यक्त केली.
निसर्गाने कोकणाला पर्यटनासाठी वरदान दिले आहे. कोकणामध्ये जास्तीत जास्त उद्योजकांनी यावे, यासाठी शासन म्हणून मी आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. कोकणात उद्योग व्यवसाय करताना उद्योजकाना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने आपल्या उद्योग संघामार्फत नेमक्या कोणत्या अडचणी आहेत, याची यादी करावी. याबाबत उद्योजकांनी योग्य पद्धतीने पाठपुरावा केल्यास येत्या ६ महीन्यांमध्ये नक्कीच सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.
कोकणामध्ये पर्यटन आणि उद्योगाच्या माध्यमातून उद्योजकांनी आपले व्हिजन प्रत्यक्ष उतरविण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक असणारे सर्व सहकार्य आपण करु असेही आश्वासन तावडे यांनी दिले. यावेळी कोकणाच्या पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना कोकण पर्यटन भूषण हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.