मृणाल गायकवाड, दिव्या बागायतकर, वैष्णवी अग्निहोत्रीची निवड
मागील वर्षी ठाण्यात झालेल्या मिस आणि मिसेस टिआरा सौंदर्य स्पर्धेतील विजेत्यांपैकी ठाण्याच्या तीन जणींची निवड आता आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या मिस आणि मिसेस हेरीटेज सौंदर्य स्पर्धा तसेच मिसेस टॉप ऑफ द वर्ल्ड स्पर्धेसाठी झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या ठाण्यातील तीन तरूणी. डावीकडून मिसेस टॉप ऑफ वर्ल्डसाठी वैष्णवी अग्निहोत्री, मिस इंटरनॅशनल हेरीटेज स्पर्धेसाठी दिव्या बागायतकर आणि मिसेस इंटरनॅशनल हेरीटेजसाठी निवड झालेल्या मृणाल गायकवाड.
मागील वर्षी झालेल्या मिस व मिसेस टिआरा सौंदर्य स्पर्धेतील विजेत्या मिसेस मृणाल गायकवाड या श्रीलंका येथे डिसेंबर महिन्यात होत असलेल्या मिसेस इंटरनॅशनल हेरीटेज स्पर्धेसाठी तर मिस इंटरनॅशनल हेरीटेज स्पर्धेसाठी दिव्या बागायतकर तसेच दिल्ली येथे होत असलेल्या आगामी मिसेस टॉप ऑफ वर्ल्डसाठी वैष्णवी अग्निहोत्री यांची निवड झाली आहे. या तिघीही ठाण्याच्या रहिवाशी आहेत. लग्नानंतर मुलींचे करिअर घर, मुल, संसार यात अडकून न राहता पती व सासरच्या मंडळींचे सहकार्य लाभले तर, मेहनत करून जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धादेखील गाजवू शकतात. फक्त मनात जिद्द हवी व योग्य मार्गदर्शन हवे असे मत सौ. मृणाल गायकवाड व सौ. वैष्णवी अग्निहोत्री यानी व्यक्त केले.
२०१७ रोजी होत असलेल्या मिस एन्ड मिसेस टिआरा सौंदर्य स्पर्धेसाठी पात्रता फेरी ( First Mega Audition round) रविवार २३ ऑक्टोबर रोजी ठाण्यात संपन्न झाली. यावेळी या तिघींचे प्रशिक्षक ऋषीकेश मिरजकर यांच्यासह त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या. टिआरा स्पर्धेसाठी देशभरातून १२० प्रवेशिका स्पर्धेसाठी आल्या होत्या. यातून २५ स्पर्धकांची मिस टिआऱा तसेच २५ जणींची निवड मिसेस टिआरा स्पर्धेसाठी करण्यात आली.
मेमरी मेकर्स कंपनीच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून निवडलेल्या स्पर्धकाना पुढे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेसाठी पात्र धरण्यात येते. विविध सौंदर्य स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून काम पाहिलेले ऋषीकेश मिरजकर यानी मागील वर्षीच्या टिआरा सौंदर्य स्पर्धेच्या स्पर्धकाना प्रशिक्षण दिले होते. या वर्षी देखील स्पर्धकाना तेच मार्गदर्शन करीत आहेत. निवडलेल्या स्पर्धकाना विशेष प्रशिक्षण, ग्रुमींग, पर्सनालिटी डेव्हलपमेंट, ब्युटी टिप्स, इमेज कन्सल्टन्सी यांचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
सौंदर्य स्पर्धांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बदलला असून छोट्या शहरातील हुशार मुलींना, गृहीणींनादेखील अशा स्पर्धेत योग्य मार्गदर्शन मिळाले, चांगले प्रशिक्षण दिले गेले तर, या मुलीदेखील जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवू शकतात, मिस व मिसेस टिआरा स्पर्धा याच हेतूने आयोजित केली जाते असे मत मेमरी मेकर्सचे व्यवस्थापकीय संचालक रेखा मिरजकर यांनी व्यक्त केले.
या पात्रता फेरीसाठी प्रख्यात फॅशन डिझायनर विशाल कपूर, ग्रुमींग सेशन स्पेशॅलिस्ट गुरमित धोरा, मेकओव्हर प्रशिक्षक संकेत भोसले, ला मा इंटरनॅशनल मॅगझिनचे श्री. बलजीत, टॅरो कार्ड रिडर व रेकी स्पेशॅलिस्ट ज्योती संगामी, हेअर व अरोमा स्पेशॅलिस्ट स्मिता चव्हाण, इमेज कन्सल्टंट आरती, नम्रता शेट्टी आदीनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.