७ आणि ८ जानेवारीला होणार प्राथमिक फेरी
नाट्यवर्तुळात प्रतिष्ठा असणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानची ‘सवाई एकांकिका’स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येत्या २५ जानेवारी २०१७ रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात रात्रभर रंगणार असून, त्यासाठी एकांकिकांची प्रवेश प्रक्रिया येत्या २० डिसेंबरपासून सुरु होत आहे.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत झालेल्या वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धातील प्रथम पारितोषिक विजेत्या एकांकिका या ‘सवाई’ स्पर्धेत सादर होणार आहेत. स्पर्धा समितीच्या शिफारसीनुसार अपवादात्मक म्हणून काही व्दितीय किंवा विशेष उत्कृष्ट एकांकिकांनाही स्पर्धेत प्रवेश देण्यात येणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी येत्या ७ व ८ जानेवारी २०१७ रोजी प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे कला अकादमीत होणार आहे. प्राथमिक फेरीतील परीक्षकांच्या निर्णयानुसार निवड केलेल्या सात एकांकिकांची अंतिम फेरी रवींद्र नाटय़ मंदिर येथे २५ जानेवारी रोजी रात्री ८.३० ते २६ जानेवारी सकाळी ६ या वेळेत होणार आहे.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज २० डिसेंबरपासून सायंकाळी ६ ते ८ या वेळेत चतुरंग प्रतिष्ठान, डी/ई, माहिमकर बिल्डिंग, बांगडवाडी, विठ्ठलभाई पटेल मार्ग, गिरगाव येथे मिळणार आहेत. तसेच chaturang1974@gmail.com या ई-मेलवरही संबंधित संस्थेला प्रवेश अर्ज मिळू शकणार आहे.
अधिक माहितीसाठी ०२२-२३८९३२८२ या फोनवर संपर्क साधावा असे आवाहन चतुरंगच्या वतीने करण्यात आले आहे.