ऍसिड हल्ल्यावर मात करण्यासाठी जनजागृती
आपल्या रॅम्पवॉकमधून जनजागृती व्हावी या उद्देश्याने अमृता फडणवीस यांनी स्त्री शिक्षणासाठीच्या मुद्याचे समर्थन करत ‘न्यूयॉर्क फॅशन वीक’मध्ये रॅम्पवॉक केला होता. याच धर्तीवर पुढे पाऊल टाकत आता आपली सामाजिक संस्था ‘दिव्यज फाऊंडेशन’च्या साथीने अजून एका समाज प्रबोधनकारासाठी त्या रॅम्पवॉक करणार आहेत.
मुंबईत 5 मार्च रोजी दिव्यज फाऊंडेशन आयोजित या कार्यक्रमात ऍसिड हल्ल्यावर मात करत ताठ मानेने आपले आयुष्य जगणाऱ्यांना आत्मविश्वास देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या पुढाकाराबद्दल बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “हल्लीच महाराष्ट्र राज्य महिला परिषदेच्या प्रमुखांनी या ऍसिड हल्ल्याचा सामना केलेल्यांशी माझी भेट घडवली आणि त्यांची प्रबळ इच्छाशक्ती पाहून मी आश्चर्यचकित झाले. त्यांचा निर्धार पाहून त्यांना ऍसिड हल्ल्याचे बळी न म्हणता त्यांनी या हल्ल्याशी चार हात करत त्याला मात दिली असेच म्हणावे लागेल. शारीरिक आणि मानसिक छळ सहन करूनही त्यांच्यातील उमेद आज जागी आहे. या मुलींमध्ये दोन मुलेही आहेत. या ऍसिड हल्ल्यावर मात करणाऱ्यांना त्यांच्या आत्मविश्वासात भर घालण्यासाठीचा प्रयत्न म्हणून दिव्यज फाऊंडेशन आयोजित या कार्यक्रमात काही उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी, सेलिब्रिटीज् आणि मी रॅम्पवॉक करणार आहोत.”
यासंदर्भात पुढे बोलताना त्यांनी बऱ्याच लोकांकडून या व्यक्ती टाळल्या जात असल्याची वेदना बोलून दाखवली. आणि यांच्या मदतीसाठी पहिले पाऊल म्हणून हा स्टेज त्यांना उपलब्ध करून देत असल्याचे त्या म्हणाल्या. या व्यक्तींमध्ये सगळ्यात लहान मुलगी माझी मुलगी दिविजा हिच्या वयाची म्हणजेच 7 वर्षांची असल्याचे म्हणताना त्यांचे डोळे पाणावले होते. अवघ्या दुसऱ्या वर्षी हा क्रूर हल्ला सहन करणाऱ्या या मुलीचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. तर आपली मुलगी दिविजाही तिच्यासोबत रॅम्पवॉक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांना आमंत्रित केल्याची माहितीही त्यांनी दिली. शिवाय या कार्यक्रमातून या ऍसिड हल्ल्यावर मात करणाऱ्या व्यक्तिंना योग्य तो रोजगार मिळवून देण्यासाठी काही उद्योजकांना आमंत्रित केल्याचेही त्या म्हणाल्या.