एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचा ‘आम्ही दोघी’
मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका असणारा एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘आम्ही दोघी’ येत्या २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे. प्रतिमा जोशी या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत.

चित्रपटाची कथा अमला आणि सावित्री सरदेसाई या दोन प्रमुख पात्रांभोवती बेतलेली आहे. या दोन्ही व्यक्तिरेखा अनुक्रमे मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांनी साकारल्या आहेत. विचारसरणी वेगळ्या असल्या तरी महिला इतर बाबतीत एकसारख्या असतात. त्यांचे अंतिम ध्येय एकच असले तरी त्या मार्ग वेगवेगळे चोखाळतात.
मुक्ता बर्वे सकारात असलेली व्यक्तिरेखा ही ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या एका गृहिणीची आहे. तिला शहरी भागाच्या जीवनशैलीचा तसा गंध नाही. प्रिया बापट ही एक थोडी वेगळ्या धाटणीची व्यक्तिरेखा साकारते आहे. त्यातून जीवनाचे तीन टप्पे अधोरेखित होतात.
‘जे मनात येईल ते पटकन करून मोकळे व्हा, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल,’ हे आहे सावित्रीच्या जीवनातील तत्वज्ञान. ती स्वतःच्या आयुष्यात या तत्वज्ञानाचे तंतोतंत पालन करते.
“मुक्ता आणि प्रिया या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकार आहेत. दोघींनीही वैविध्यपूर्ण भूमिका करत स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या तशाच वेगळ्या भूमिका असेलेला हा चित्रपट म्हणजे रसिकांसाठी एक मेजवानीच असणार आहे. मराठी रसिक म्हणूनच या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहेत,” असे उद्गार एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या संजय छाब्रिया यांनी काढले.
“आम्ही दोघी’ हा चित्रपट प्रख्यात दिवंगत मराठी लेखिका गौरी देशपांडे यांच्या कथेवर बेतलेला आहे. गौरी देशपांडे या काळाच्या पुढे चालणाऱ्या प्रागतिक लेखिका होत्या. त्यांच्या कादंबरी, लघुकथा आणि कविता खूपच गाजल्या त्या त्यातील संकल्पनाच्या ऊंचींसाठी. त्यांनी स्वतःच्या शैलीतून साहित्यिक जगतात स्वतःचे स्थान निर्माण केले,” असे उद्गार चित्रपटाच्या दिग्दर्शिका प्रतिमा जोशी यांनी काढले आहे.
“आजच्या तरुणींना त्यांच्या नात्यांमध्ये जे संबंध अपेक्षित असतात त्यांच्या जवळ जाणारी ही कथा आहे. ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची आणि म्हणूनच त्यांना प्रिय असलेली गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप–मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. हा विषय प्रत्येक तरुणीशी भावनात्मकरित्या जोडला जाणारा आहे, म्हणूनच प्रेक्षक त्याबाबत संवेदनशीलरित्या जोडला जाईल,” त्या पुढे म्हणतात.
गौरी देशपांडे यांच्या लिखाणावर बेतलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते, असेही त्यांनी म्हटले आहे. “मी फार पूर्वीच ठरविले होते की जेव्हा केव्हा मी स्वतः चित्रपट दिग्दर्शित करेन, तेव्हा तो गौरी देशपांडे यांच्या पुस्तकावर आधारित असेल,” त्या म्हणतात. मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या दोन प्रतिभावान अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. दोघींनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्याबरोबर किरण करमरकर, भूषण प्रधान, आरती वडगबालकर आणि प्रसाद बर्वे यांच्या भूमिका आहेत.
प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव यांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. या चित्रपटात केवळ एकच गाणे आहे. ‘कोणते नाते म्हणू हे गुंतणे न टाळणे…,’ हे ते गाणे गुरु ठाकूर यांनी लिहिले आहे आणि त्याची रचना मंगेश धाकडे यांनी केली आहे. वैशाली माडे यांनी ते गायले आहे.
‘आम्ही दोघी’ची निर्मिती आणि सादरीकरण एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे संजय छाब्रिया यांचे आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या नावावर कितीतरी गाजलेले चित्रपट आहेत. त्यांत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, टाईम प्लीज, मुंबई-पुणे-मुंबई २, कॉफी आणि बरंच काही, बापजन्म आणि इतरही अनेक चित्रपटांचा समावेश आहे.