रसिकांच्या भेटीला येतेय भक्तीगीत
महाराष्ट्राला संगीत आणि संगीतप्रेमींची फार मोठी परंपरा आहे. इथला रसिकराजा जितक्या आनंदाने सिने-नाटय गीतं डोक्यावर घेतो तितक्याच भक्तीभावाने देवी-देवतांच्या भजनातही रमतो. याच कारणामुळे महाराष्ट्राच्या घराघरात जशी सिनेमा आणि नाटकांची गाणी वाजतात तशीच भक्तीगीतंही मोठया श्रद्धेने ऐकली जातात. आता भक्तीरसाने भरलेलं‘ माझी माय मुंब्रादेवी’ हे गीत रसिकांच्या भेटीला येत आहे.
श्री चंद्रछाया प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘माझी माय मुंब्रादेवी’ या गाण्यामध्ये मुंब्रादेवीची महती वर्णन करण्यात आली आहे. प्रवीणा समीर देसाई, सतिश चंद्रकांत देसाई, समीर चंद्रकांत देसाई यांनी “तुझ्या डोंगराची सावली आम्हावरी, माझी माय मुंब्रादेवी…’’ या गीताची निर्मिती केली आहे.“ या कोळीवाडयाची शान…’’ फेम संगीतकार-गायक प्रविण कुंवर यांनी या गाण्याला संगीत दिलं असून समीर चंद्रकांत देसाई यांनी गीत लेखन केलं आहे. वैशाली सामंत आणि प्रविण कुंवर यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं ध्वनीमुद्रित करण्यात आलं आहे. राजेंद्र पवार आणि प्रवीणा समीर देसाई यांनी या गाण्याचे व्हिडीओ दिग्दर्शन केलं आहे. केमेरामन सुजीत खवणकर यांनी या गाण्याचे छायालेखन केलं आहे. कै. छाया देसाई आणि कै. चंद्रकांत देसाई यांना समर्पित करण्यात आलेलं हे गीत केवळ मुंब्रादेवीच्याच भक्तांना नव्हे, तर तमाम संगीत प्रेमींना आपलंसं वाटेल, असं मत निर्माते देसाई बंधू यांनी व्यक्त केलं.
‘माझी माय मुंब्रादेवी’ या गाण्यामध्ये मुंब्रादेवीची कथा आणि महती ऐकायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या संगीतकारांपैकी एक असलेल्या प्रवीण कुंवर यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, ‘‘आजवरच्या कारकिर्दात मी बऱ्याच देवी-देवतांच्या गीतरचना संगीतबद्ध केल्या असून रसिकांनी त्यांना उत्तम प्रतिसाद दिला आहे. ‘माझी माय मुंब्रादेवी’ हे गाणंही त्याच तोडीचं असून रसिकांच्या मनात घर करणारं आहे. वैशाली सामंतच्या सुमधूर आवाजात मुंब्रादेवीचं गीत ऐकताना भक्तांंचा आनंद द्विगुणीत होईल याबाबत शंका नाही. ‘माझी माय मुंब्रादेवी’च्या निमित्ताने माझ्याकडून मुंब्रादेवीची संगीतमय सेवा घडल्याचा विशेष आनंद होतो आहे.’’
मुंब्रादेवी हे अनेक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मुंब्रादेवीवर गाणं करण्याची संधी मिळाल्याने राजेंद्र पवार आणि प्रवीणा समीर देसाई हे दिग्दर्शक स्वतःला भाग्यवान मानतात. ‘माझी माय मुंब्रादेवी’च्या निमित्ताने मुंब्रादेवीचं निवासस्थान असलेल्या डोंगराचं निसर्गसौंदर्य कैमेरात कैद करता आलं. या गाण्यामुळे मुंब्रादेवीची महती सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल अशी भावना दिग्दर्शकांनी व्यक्त केली. लवकरच हे गीत इंटरनेटच्या माध्यमातून घराघरात पोहोचणार आहे.