चित्रपट १२ जूनला प्रदर्शित होणार थेट झी टॉकीजवर!
विनोदाची खमंग मेजवानी घेऊन १२ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या मधु इथे अन चंद्र तिथे चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा अभिनेता अंकुश चौधरीच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
मधु इथे अन चंद्र तिथे हा मनोरंजक सिनेमा प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील असे सांगत अंकुशने चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. ‘चित्रपंढरी’ या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती झी टॉकीज आणि रत्नकांत जगताप यांनी केली असून दिग्दर्शक संजय झणकर आहेत. मधु इथे अन चंद्र तिथे या चित्रपटातून एक रंजक कथा आपल्यासमोर उलगडणार आहे. प्रत्येक शहराची स्वत:ची एक खासियत असते. हीच खासियत घेऊन कोल्हापूर व पुणे हे एकत्र आल्यावर उडणाऱ्या धमाल कथेची मेजवानी म्हणजे मधु इथे अन चंद्र तिथे हा सिनेमा.
धमाल, मस्ती, हास्याचे स्फोट घडवत प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी हा सिनेमा देणार आहे. कथा-पटकथा व संवाद सुनिल हरिश्चंद्र यांचे आहेत. छायाचित्रण गौरव पोंक्षे यांचं असून संकलन साहिल तांडेल यांचं आहे. आनंद इंगळे, भाऊ कदम यांच्यासह किशोर चौघुले, शैला काणेकर, विशाखा सुभेदार, संजय मोहिते, गणेश रेवडेकर, रवींद्र तन्वर या विनोदवीरांच्या फौजेसह ऋतुराज फडके, शाश्वती पिंपळीकर ही फ्रेश जोडी मधु इथे अन चंद्र तिथे चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या भेटीला येणार आहे. १२ जूनला दुपारी १२.०० वा. व सायं ६.०० वा. हा सिनेमा प्रेक्षकांना झी टॉकीजवर पहाता येणार आहे.