कर्जतच्या चित्रकार अश्विनी बोरसे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन
अज्ञात आकार व त्यांची वैविध्यपूर्ण रचना याचे सुसंगत रंगलेपन असणारे अश्विनी बोरसे यांचे ‘अज्ञात’ हे एकल चित्रप्रदर्शन येत्या १३ फेब्रुवारीपासून ‘द लिला’ या पंचतारांकीत हॉटेलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन १९ फेबुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
सूर्य या शब्दात जसा प्रकाश पकडता येणार नाही, पाणी हा शब्द ज्याप्रमाणे तहान भागवू शकणार नाही आणि गुलाब हा शब्द सुगंध देऊ शकत नाही. त्याप्रमाणे सौंदर्य हेदेखील शब्दात मांडता येऊ शकत नाही.आकारांमधून ते व्यक्त होते, परंतु ते नेहमीच निराकार आहे आणि किंबहुना त्यामुळेच ते अनेक आकारांमधून प्रगट होऊ शकते. हीच सौंदर्याची अव्यवक्तता रंग आणि कुंचल्यांच्या सहाय्याने व्यक्त करण्याचा प्रयत्न कर्जत येथे वास्तव्यास असलेल्या अश्विनी बोरसे यांनी केला आहे. त्यांच्या ‘अज्ञात’ या आगामी चित्रप्रदर्शनाची हीच संकल्पना आहे.
चित्र हे केवळ आनंद मिळवण्याचे माध्यम आहे. मी केवळ आनंदासाठी चित्र निर्मिती करते असे अश्विनी सांगतात. पैसा, प्रसिद्धी यासारख्या कुठल्याही हेतूशिवाय त्या चित्र काढतात व हे निर्हेतूक कृत्यच त्यांच्या आनंदाचा ख-या अर्थाने स्त्रोत आहे, असेच म्हणावे लागेल. चित्रनिर्मितीनंतर मिळणारा पैसा व प्रसिद्धी हे आपल्या मनस्वी आनंदातून जन्माला येणारे घटक होत, पण त्याकरिता चित्र काढण्याची प्रक्रिया नसावी असे अश्विनी यांचे मत आहे. चित्र समजण्याचा विषय नसावा तर जाणीवांच्या स्तरावर बघणा-याने त्याचा आनंद घ्यावा. ज्याप्रमाणे अस्तित्त्वातील एक पानसुद्धा दुस–या पानासारखे नसते. त्याप्रमाणे चित्र हे सुद्धा कुणाची प्रतिकृती नसावी असे त्यांना वाटते. चित्राला स्वत:चे व्यक्तिमत्त्व असावे. ज्याप्रमाणे निसर्गामध्ये कोणताही अहंभाव दिसत नाही, तर फक्त क्रिया दिसतात. प्रत्येक दृश्य उत्स्फूर्तपणे घडून गेल्यासारखे जाणवते. हाच भाव त्यांनी आपल्या चित्रांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला जाणवतो.
अश्विनी यांच्या चित्रांमधील रंग व सहज उत्स्फूर्त रंगलेपनाची पद्धत कलासिकांना नक्कीच भूरळ पाडेल. अज्ञात आकार व त्यांची वैविध्यपूर्ण रचना हे त्यांच्या चित्रांचे प्रमुख वैशिष्टय़ होत. ‘अज्ञात’ हे शीर्षक असलेले त्यांचे हे पहिलेच एकल चित्रप्रदर्शन कलारसिकांनी नक्की पाहावे, असेच आहे. सदर प्रदर्शन येत्या १३ फेब्रुवारीपासून १९ फेबुवारीपर्यंत अंधेरी येथील सहारा विमानतळाजवळील ‘द लिला’ या पंचतारांकीत हॉटेलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.