समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज
लोकप्रिय गायक अनुप जलोटा यांच्या शुभहस्ते ‘फॅमिली 420’ या चित्रपटाच्या पोस्टरचे लोकार्पण नागपूर येथे करण्यात आले असून, लावण्या प्रॉडक्शन अँड क्रिएशन्सची निर्मिती असलेला हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
देव राज यांची निर्मिती असलेला तसेच संतोष गायकवाड यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात आजच्या समाजव्यवस्थेवर विनोदी अंगाने भाष्य करण्यात आलं आहे. निखळ विनोद आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांची अचूक सांगड घालत दिग्दर्शक संतोष गायकवाड आणि निर्माते देव राज यांनी ‘फॅमिली 420’ हा चित्रपट बनवला आहे.
मराठीतील आघाडीच्या विनोदवीरांसोबतच बॉलीवूडपट गाजवणाऱ्या कॉमेडीवीरांचा अभिनयही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. असरानी, सुनिल पाल, उपासना सिंह, विजय पाटकर, विजय कदम, स्वप्निल राजशेखर, आशिष नेवालकर, हर्षदा पाटील, सुकन्या कुलकर्णी, गीता निखारगे या कलाकारांच्या अभिनयाने हा चित्रपट सजला आहे.
सुबोध नागदेवे यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून बीना सातोस्कर आणि सुबोध नागदेवे यांनी गीतलेखन केलं आहे. संगीतकार सुशील पेंढारी यांनी या गीतांना स्वरसाज चढवला आहे. अवधूत गुप्ते, वैशाली माडे, बेला शेंडे, सुदेश भोसले, नेहा राजपाल या मराठीतील आघाडीच्या गायकांनी या चित्रपटातील गीतांना स्वर दिला आहे. लवकरच ‘फॅमिली 420’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.