९ फेब्रुवारीला श्री षण्मुखानंदमध्ये आयोजन
‘सूरसागर’ सांगीतिक मालिकेत चंदेरी आवाजाचे दैवी देणे लाभलेल्या भाग्येश मराठेच्या स्वरांनी रसिकांची मने तृप्त होणार आहेत. ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून मुंबईतील सायनस्थित श्री षण्मुखानंद पद्मा रंगा चेंबर म्युझिक हॉल येथे रंगणाऱ्या या मैफलीत भाग्येश यांना तबल्यावर साथ करणार आहेत स्वप्निल भिसे आणि सिद्धेश बिचोळकर संवादिनीचे सूर छेडणार आहेत.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर मैफलीत मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.
ज्येष्ठ गायक पंडीत राम मराठे यांचा भाग्येश मराठे हा नातू असून त्याने वयाच्या चौथ्या वर्षी तबला शिकण्यास सुरूवात केली. त्यानंतर, जवळजवळ १५ वर्षे त्याने प्रभू घाटे, त्याचे काका मुकुंद मराठे, पं. मुकुंदराज देव आणि गजानन राऊळ (उस्ताद अल्लारखॉं खान साहेब यांचे शिष्य) यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. त्याने मुंबईच्या के. सी. महाविद्यालयातून माहिती तंत्रज्ञान विषयात पदवी संपादन केली. वयाच्या १९ व्या वर्षी वडलांच्या सल्ल्यावरून त्याने आजोबांची तसेच, अन्य भारतीय शास्त्रीय गायकांची गायकी ऐकण्यास व त्याचा अभ्यास करण्यास सुरूवात केली. पं. कुमारजी आणि आपल्या आजोबांची गायकी ऐकून तो थक्क झाला आणि गायनालाच आपला पेशा म्हणून स्वीकारण्याचे त्याने ठरवले. त्याने आपले वडील पं. संजय मराठे यांच्याकडून गायनाचे धडे गिरवण्यास सुरूवात केली. सध्या तो हुबळी येथील डॉ. गंगुबाई हनगल गुरूकूलात पं. केदार बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरशिक्षण घेत आहे.
श्री षण्मुखानंद फाईन आर्ट्स आणि संगीत सभेची स्थापना १९५२ मध्ये झाली. सभेतर्फे दर महिन्याचा दुसरा शुक्रवार हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगिताला वाहिला जातो. उत्सुक विद्यार्थ्यांना भारतीय फाईन आर्ट्सच्या क्षेत्रात सुयोग्य प्रशिक्षण देणे तसेच, भारतीय पारंपरिक परफॉर्मिंग आर्ट्सना प्रोत्साहन देऊन तरुणांना आपल्या कला सादर करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ निर्माण करून देणे हा या संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश होता. कर्नाटिकी संगीत आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रशिक्षणासाठी सभेमार्फत संगीत विद्यालयही चालवण्यात येते.
सभेंतर्गत पाश्चात्य व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व भरतनाट्यम नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण देण्यासाठी संगीत विद्यालयाची स्थापनाही करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, समाजातल्या वंचित गटांसाठी किफायतशीर हेल्थकेअर सेवा पुरवण्याचे कामही या सभेतर्फे सक्रीयपणे केले जाते. या माध्यमातून, विविध राष्ट्रीय उपक्रमांना ही संस्था हातभार लावत असते.
भारतीय तरुणांची परफॉर्मिंग आर्ट्सच्या क्षेत्रातली कौशल्ये आजमावण्यासाठी षण्मुखानंद फाईन आर्ट्स आणि संगीत सभेतर्फे `सूरसागर – दर महिन्याला एक उगवता तारा` ही मासिक मालिका सुरू करण्यात आली असून एप्रिल २०१७ ते २०१८ या कालावधीत ही मालिका सुरू राहणार आहे. या मासिक मालिकेमध्ये गायन आणि वादन अशा दोन्ही प्रकारचे परफॉर्मन्सेस सादर केले जाणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर या कार्यक्रमाचा प्रवेश विनामूल्य आहे. आपली नाव नोंदणी sursagar.sabha@gmail.com या ई-मेल आयडीवर करू शकता.