महाराष्ट्रातील वास्तव मांडणारी हृदयस्पर्शी गोष्ट
‘निवडुंग’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना महाराष्ट्रातील वास्तव पडद्यावर पाहायला मिळणार आहे. शहरात राहणाऱ्यांना सारं काही सहज उपलब्ध होतं, परंतु खेडयांमधील नागरिकांना कशाप्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं याचं चित्रण ‘निवडुंग’मध्ये केले आहे. महाराष्ट्रातील दुष्काळाचं भयाण वास्तव पडद्यावर मांडण्याचं धाडस दिग्दर्शक मुनावर भगत यांनी ‘निवडुंग’ या चित्रपटात केलं आहे. येत्या २१ ऑक्टोबर रोजी ‘निवडुंग’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘निवडुंग’च्या कथानकाला कर्णमधुर संगीताची जोड देत मुनावर भगत एक संगीतप्रधान चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. ‘निवडुंग’ हे या चित्रपटाचं शीर्षक अतिशय मार्मिक असून, कथानकाला साजेसं आहे. ‘निवडुंग’च्या माध्यमातून समाजातील वास्तव पडद्यावर मांडताना कथानकात गुंफण्यात आलेली काही आश्चर्यकारक वळणं प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवतील. प्रेमकथेच्या अनुषंगाने समाजातील आजवर कधीही प्रकाशात न आलेले पैलू ‘निवडुंग’मध्ये सादर करण्यात आले आहेत.

‘निवडुंग’ची कथा आजच्या तरूणाची आहे. निसर्गाने निर्माण केलेल्या परिस्थितीशी संघर्ष करत स्वतः प्रारब्ध बदलू पाहणारा धाडसी तरूण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दुष्काळासारखा कोरडा विषय हाताळताना मुनावर भगत यांनी त्याला प्रेमाच्या गुलाबी रंगाची किनार जोडली आहे. निर्मिती आणि दिग्दर्शनासोबत मुनावर भगत यांनीच ‘निवडुंग’ची कथा लिहिली असून महेंद्रपाटील यांनी पटकथा-संवाद लिहिले आहेत.
शेखर फडकेने साकारलेला सावकारही लक्षात राहण्याजोगा आहे. कलाकारांचा उत्तम अभिनय आणि दर्जेदार निर्मिती मूल्यांच्या बळावर ‘निवडुंग’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात नक्कीच यशस्वी होईल अशी खात्री निर्माते-दिग्दर्शक मुनावर भगत यांना वाटते.
भूषण आणि संस्कृतीसोबत सारा श्रवण, आस्ताद काळे, प्राजक्ता दिघे, शेखर फडके या कलाकारांच्याही ‘निवडुंग’मध्ये भूमिका आहेत. या चित्रपटात वेगवेगळया मूडमधील एकूण सहा गाणी असून सर्व गाणी चित्रपटाच्या कथानकाला गती प्रदान करणारी तसंच एकरूप होणारी आहेत. संगीतकार रफीक शेख यांनी संगीतबद्ध केली आहेत. झहीर कलाम, प्रसाद कुलकर्णी, कवी शरद यांनी या चित्रपटातील गीतरचना लिहिल्या आहेत. शशिकांत मिना या सिनेमाचे सहदिग्दर्शक असून एकेन. सेबास्टेन या सिनेमाचे केमेरामन आहेत. मेघा सपंत यांनी या चित्रपटातील तीन गाण्यांसाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे. संदिप मोरे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. शिर्डी जवळच्या काकडी या ठिकाणच्या वास्तवदर्शी लोकेशन्सवर या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.