वाशीत तमाशा ढोलकीफड महोत्सव सुरू
वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरसमोरील मैदानात आजपासून सुरु झालेल्या तमाशा ढोलकीफड महोत्सवाची सुरवात तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणार्या पुरस्कार वितरण सोहळ्याने झाली.
‘गेली ४२ वर्षे लोककलेचा वारसा पुढे नेण्याच्या कामाचे आज विठाबाई नारायणगावकर यांच्या नावे मिळालेल्या पुरस्कारांच्या निमित्ताने चीज झाले असून राज्य शासनाने केलेला हा सन्मान जीवन कृतार्थ करणारा आहे, या पुरस्काराचा खरा हक्कदार माझा मोठा भाऊ भिका सांगवीकर आहे, त्याने मला बोट धरून तमाशाच्या क्षेत्रात आणले,त्याला हा पुरस्कार मिळायला हवा होता, पण दुर्दैवाने तो आज आपल्यात नाही, हा पुरस्कार मी त्याच्या अद्वितीय कार्याला समर्पित करतो’ अशा भावपूर्ण शब्दात ज्येष्ठ तमाशा कलावंत भीमराव तोताराम सांगवीकर उर्फ भीमाभाऊ सांगवीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, तेव्हा उपस्थित तमाशाप्रेमी रसिकही गहिवरले आणि उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांनी या ज्येष्ठ कलावंताला मानवंदना दिली.
निमित्त होते महाराष्ट्र शासनातर्फे ज्येष्ठ तमाशा कलावंत तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘कलावंताकडून कलावंतांचा सत्कार’ या नव्या धोरणानुसार या पुरस्काराचे प्रदान मागील वर्षीच्या पुरस्कारप्राप्त श्रीमती प्रभा शिवणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळीसांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार नरेंद्र पाटील हे मान्यवर उपस्थित होते..
तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी कांताबाई सातारकर, वसंत अवसरीकर, सुलोचना नलावडे, हरिभाऊ बडे, मंगल बनसोडे, साधु रामा पाटसुते, अंकुश संभाजी खाडे ऊर्फ बाळू, प्रभा शिवणेकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातील ज्येष्ठ तमाशा कलावंत भीमराव तोताराम गोपाळ उर्फ भीमाभाऊ सांगवीकर हे भिका भीमा सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या माध्यमातून लोककलेचा वारसा पुढे नेत आहेत. गेली ४२ वर्षे त्यांनी तमाशा लोककलेला पुढे नेण्याचे कार्य केले आहे. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी शाळा आणि देवस्थानांच्या इमारतींसाठी मदत देण्याचे कार्यदेखील केले आहे.
वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरसमोरील मैदानात आजपासून सुरु झालेल्या तमाशा ढोलकीफड महोत्सवाची सुरवात या पुरस्कार वितरण सोहळ्याने झाली. याच ठिकाणी दिनांक ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी पर्यंत दररोजसंध्याकाळी ७ वाजता तमाशा ढोलकीफड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील विविध भागातील निवडक पारंपरिक तमाशा सादर करणारे ढोलकीफड पथके सहभागी होणार आहेत. तमाशा फडाचे हे सर्व कार्यक्रम रसिकांना विनामूल्य पाहता येतील .
शनिवारी रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ, नारायणगाव, पुणे , रविवारी काळू-बाळू कौलापूरकर लोकनाट्यतमाशा मंडळ, कौलापूर, सांगली, सोमवारी मंगला बनसोडेसह नितीन बनसोडे करवडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, कराड सातारा, मंगळवारी रेखा पाटील कोल्हापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ, कोल्हापूर बुधवारी संंगीता महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ, नारायणगाव, पुणे ही तमाशापथके या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
या महोत्सवात तमाशाप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.