‘आर्त’मुळे मुलभूत ह्क्काची जाणीव होईल : मुक्ता दाभोळकर
डी.एस.फिल्म्स निर्मित आणि ॠषीराज क्रिएशन कृत, निर्माता दिलीप शहा आणि राजेंद्र जी.साळी लिखित, दिग्दर्शित ‘आर्त’ या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच अं.नि.स.च्या मुक्ता दाभोळकर यांच्या हस्ते मुंबईत पार पडला, यावेळी चित्रपटातील शीतल साळुंके, गणेश यादव, जयराज नायर, संतोष मयेकर, अजित सावंत, अजित भगत इ.कलाकार देखील उपस्थित होते.
यावेळी मुक्ता दाभोळकर यांनी सांगितले की, सर्वप्रथम तर मी आर्त चित्रपटाच्या सर्व टीमचे अभिनंदन करते कारण त्यांनी इतका मोठा आणि गंभीर विषय हाताळला, जातपंचायत फक्त अशिक्षित आणि आदिवासी समाजातच आहे असं नाही, तर सुशिक्षित समाजातही याचे प्रमाण मोठे आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं अनेक वर्ष जातपंचायतीच्या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध लढा पुकारल्यानंतर आज महाराष्ट्रात जातपंचायतीवर कायदा करण्यासाठी आंदोलन उभं होत असतांना, ‘आर्त’सारख्या चित्रपटातून या विषयाला लोकांपर्यंत पोहचवणे म्हणजे मला मोठे धाडस वाटते.
‘आर्त’ हा मराठी चित्रपट येत्या २० मे २०१६ रोजी सम्पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे, चित्रपट हा जातपंचायत या व्यवस्थेवर कटाक्ष टाकतो, महाराष्ट्रात अनेक ग्रामीण भागांत आणि संपूर्ण देशभरात अनेक राज्यात अशा पीड़ित महिलेंच्या घटना रोज वर्तमानपत्रातून वाचायला मिळतात, परंतु यावर सिनेमा करण्याचे धाडस कुणी करत नाही, परंतु गल्लाभरु विषयाला बगल देत मी हा विषय खुप सवेंदनशीलपणे चित्रपटात मांडला आहे, अशी प्रतिक्रिया लेखक दिग्दर्शक राजेंद्र जी.साळी यांनी व्यक्त केली आहे,
ते पुढे सांगतात की, अशा विषयाला स्थापित आणि ज्यांची काही ठराविक इमेज आहे असे कलाकार घेणे मी हेतुपुरस्कर टाळले आहे, सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या या धाडसी विषयाला चित्रपट निर्माता म्हणुन दिलीप शहा यांनी विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचा खुप आभारी आहे.
लेखक दिग्दर्शक राजेंद्र जी.साळी पुढे सांगतात की, या विषयाची दाहकता फक्त चित्रपटगृहात न राहता संपूर्ण देशभरात व्हावी यासाठी आणि या बाबतचा कायदा लवकर मंजूर व्हावा यासाठी आम्ही लोकसभेच्या सर्व सदस्यांसाठी एक विशेष खेळ आयोजित करणार आहोत.