सुप्रसिद्ध चित्रकार शैलेश सोनावणे यांचे `कलर्स ऑफ सिझन’ हे चित्रप्रदर्शन २७ जानेवारीपासून मुंबईतील जहांगीर कलादालनात सुरू होणार असून, ते २ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. चित्ररसिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ७ यावेळेत पाहता येईल.
पुणे येथील प्रथितयश चित्रकार शैलेश सोनावणे यांनी अलीकडच्या काळात साकार केलेली चित्रे या प्रदर्शनामध्ये मांडण्यात येणार आहेत. कागदावरील जलरंग, कॅनव्हासवरील तैलरंग व ऍक्रिलीक रंगातील चित्र या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत.चित्रकार शैलेश सोनावणे हे सिद्धहस्त कलाकार असून, त्यांनी अनेक वर्षांच्या साधनेतून स्वत:ची अनोखी शैली विकसित केली आहे. अगदी तरुण वयात त्यांनी कुंचला हाती धरला आणि वडील एम. बी. सोनावणे यांच्यापासून स्फुर्ती घेऊन कलाआराधना चालू ठेवली. दोन वेळा `वर्ल्ड पेंटर कॉन्टेस्ट’चा प्रतिष्ठेचा पुरस्कार कमावणाऱया या कलाकाराने इंटरनॅशनल वॉटरकलर सोसायटीच्या `आर्ट ओ आर्ट’ या कायमस्वरूपी कलादालनात आपल्या चित्रांद्वारे मानाचे स्थान प्राप्त केले आहे.
अप्रतिम सागर किनारे, निवांत ग्रामीण जीवन, शहरातील गजबजलेले, वाहतुकीने भरून वाहणारे रस्ते, मच्छीमारांची विश्रांती घेणारी गलबते, कौलारू घरे अशी अनेक प्रत्ययकारी निसर्गचित्र या प्रदर्शनात मांडली असून, कलाप्रमींनी हे प्रदर्शन अवश्य बघावे, असेच असणार आहे.