वरूणराजाच्या साक्षीने प्रोमो आणि पोस्टरचे लॉंचिंग
‘पालवी क्रिएशन्स’च्या ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या सामाजिक-कौटुंबिक चित्रपटाचे निर्माते म्हणून नाना पेठेतील विशाल धनवडे यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यांच्या या चित्रपटाच्या मुहूर्ताचं चित्रीकरण बाप्पाच्याच चरणी झालं आहे. येत्या २४ जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, प्रमोशनची सुरुवातही पुण्यातल्या अखिल मंडई मंडळाच्या ‘शारदा गणपतीच्या’ महाआरतीने करण्यात आली.
पुण्यातील मानाच्या गणपती मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी, श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंडळाचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, अखिल मंडई मंडळाचे पदाधिकारी संजय मते, केसरी गणेशोत्सवाचे रोहित टिळक इत्यादी मान्यवरांच्या हस्ते ही महाआरती करण्यात आली. यावेळी महापौर प्रशांत जगताप, ऍड. प्रताप परदेशी, डॉ मिलिंद भोई, नगरसेविका रुपाली पाटील, शिरीष मोहिते, नगरसेवक रविंद्र माळवदकर, गजानन पंडित आदी मान्यवरांसह चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, माजी अध्यक्ष विजय पाटकर, निकिता मोघे, चैत्राली डोंगरे, संजय ठुबे चित्रपटाला सदिच्छा व्यक्त करण्यास उपस्थित होते.

‘दमलेल्या बाबाची कहाणी’चे निर्माते विशाल धनवडे, चित्रपटाचे दोन्ही दिग्दर्शक नितीन चव्हाण-योगेश जाधव, चित्रपटातील प्रमुख भूमिकेतील प्रसिद्ध कवी आणि अभिनेता संदीप खरे, अभिनेत्री दीप्ती भागवत, बाल अभिनेत्री श्रीया पासलकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या श्री शारदा गजाननाच्या महाआरतीस वरूणराजानेही हजेरी लावत आशीर्वाद दिला. सिनेमाच्या प्रिंटचे, श्री चरणी पूजन करण्यात आले. महापौरांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचे तर गोडसे यांच्या हस्ते सिनेमाच्या प्रोमोचे लॉंचिंग करण्यात आले.
निर्मितीच्या पहिल्याच अनुभवाविषयी सांगताना विशाल धनवडे म्हणाले की, ‘चित्रपटाची निर्मिती करेन असे कधी वाटले नव्हते. मी गणेशोत्सवाचा एक साधा कार्यकर्ता आहे. गणेशोत्सवाचे देखावे करणे मला आवडते. ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ ही कथा मला आवडल्याने सामाजिक जाणिवा जपण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.’

चित्रपटाविषयीची भूमिका व्यक्त कराताना दिग्दर्शक योगेश जाधव म्हणाले की, ‘प्रेक्षकांना एक चांगला चित्रपट द्यावा ही मनात इच्छा होती. मसालापटाच्या भाऊगर्दीचा भाग मला व्हायचे नव्हते यामुळे वेगळ्या कथेच्या शोधात होतो. नितीन चव्हाणची ‘ओझं’ ही एकांकिका पुरुषोत्तम करंडकामध्ये पहिल्या नऊमध्ये आली होती, बाप आणि मुलीचे नाते सांगणारी ही कथा थेट मनाचा ठाव घेणारी आहे. टिपीकल क्लिशे होऊ नये याची आम्ही पुरेपुर काळजी घेतली आहे. आज आपल्या भोवतालची परिस्थिती बघितली की जाणीव होते आम्ही योग्य विषय चित्रपटातून हाताळला आहे.’
‘दमलेल्या बाबाची कहाणी’हा फक्त चित्रपट नव्हे तर सामाजिक विचार आहे. ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या गाण्यातून बाबाची व्यथा मांडली होती आता या चित्रपटाच्या माध्यमातून त्याहीपुढे जाऊन खूप काही सांगण्याचा प्रयत्न केल्याचे अभिनेते संदिप खरे यांनी सांगितले. बाबा हा न बोलणारी आई असतो, आई एवढचं प्रेम, काळजी त्यालाही असते. एका गाण्यातून तयार झालेला हा पहिलाच सिनेमा आहे. समाजात जे काही अनुचित प्रकार होत असतात त्यावर भाष्य करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत असे वाटते. समाजात एक टक्का बदल झाला तरी ते आमचे यश असेल, पहिल्यांदाच मध्यवर्ती भूमिका साकारत असून सहकलाकांराकडून बरेच काही शिकायला मिळाल्याचे संदिप खरे यांनी नमुद केले.

भारतीय संस्कृतीची जपवणुक ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या सिनेमाद्वारे केल्याबद्दल निर्माता, कलाकार आणि दिग्दर्शकाचे आभार मानायला हवेत असे नमूद करताना महापौर प्रशांत जगताप म्हणाले, बाबाची व्यथा, प्रेम या माध्यमातून समोर येत आहे ही चांगली बाब आहे. मराठी सिनेमाचा दर्जा बदलत असल्याने मराठी प्रेक्षक वाढल्याचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो ही सामाजिक जाण असलेल्या निर्माता विशाल धनवडे यांनी समाजासाठी बनवलेल्या या चित्रपटातून जे उत्पन्न येईल त्या उत्पन्नातून, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी मदत करून ज्या समाजाने आपल्यावर संस्कार केले त्या समाजाचं देणं काही अंशी तरी फेडणार आहेत. २४ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत असून विशेष म्हणजे जुलै महिन्यात अमेरिकेतदेखील प्रदर्शित होत आहे आणि प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने यशाच्या पायऱ्या चढायलादेखील सुरुवात केली आहे! नाशिक आणि गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाची निवड झाली असून, आवर्जून बघावे अशा चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट जाऊन बसला आहे.