मुंबईतील पु.ल देशपांडे अकादमी’च्या वतीने विविध कार्यक्रमांची रेलचेल
*‘ओळख लोकसंस्कृतीची’ या लोककलेच्या अभ्यासपूर्ण सुरेल युवा आविष्काराने महोत्सवाचा शुभारंभ
*कार्यक्रम आखणी, आयोजन, संचालन, निवेदन अश्या सर्वच बाबींची जबाबदारी युवा पिढीकडे
*महाकवी कालिदास यांच्या काव्यावर आधारित नृत्य नाटिका ‘ऋतूसंहार’
*युवा शास्त्रीय गायिका भाग्यश्री पांचाळे यांची मैफल
*संपूर्ण रात्रभर विविध स्पर्धांतून गाजलेल्या एकांकिकांचा महोत्सव ‘नाट्यजागर’
*भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा मिलाफ असलेल्या म्युझिकल बँड ‘ध्वनी’ चे सादरीकरण
*मान्यवर प्रशिक्षकांच्या पूर्ण चारही दिवस मोफत कार्यशाळा
*राज्यभरातील नव्या दमाच्या शाहीरांचा शाहिरी जलसा
*पुलंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वावर आधारित अभिवाचनाचा दृकश्राव्य कार्यक्रम ‘अपूर्व पुल’
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या ‘पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’तर्फे येत्या ५ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान भव्य स्वरूपाच्या पु.ल युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नाट्य, नृत्य, कला आणि संगीत क्षेत्रातल्या समकालीन उत्तमोत्तम कार्यक्रमांची आणि कार्यशाळांची रेलचेल या महोत्सवात आहे.
आजची तरुण पिढी ज्यांच्या लिखाणावर बेहद्द प्रेम करते अश्या पुलंच्या स्मरणार्थ होणा-या या महोत्सवात युवकांचा सहभाग अधिकाधिक व्हावा या दृष्टीने या महोत्सवाची रचना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कार्यक्रम आखणी, आयोजन, संचालन, निवेदन अश्या सर्वच बाबींची जबाबदारी युवा पिढीकडे देण्यात आली असून युवा कलाकारांचा सहभाग हे या महोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य आहे.
‘ओळख लोकसंस्कृतीची’ या लोककला, लोकसंस्कृती आणि लोकगीतांच्या अभ्यासपूर्ण सुरेल आविष्काराने या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी ५ नोव्हेंबरला संध्याकाळी साडेसहा वाजता संपन्न होणार आहे.युवा कलाकारांचा हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम उद्घाटन सोहळ्याचे खास आकर्षण आहे. महाकवी कालिदास यांच्या काव्यावर आधारित नृत्य नाटिका ‘ऋतूसंहार’ शुक्रवारी ६ नोव्हेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता सादर होईल. कलाश्री नृत्यालय, पुणे यांची निर्मिती असलेल्या या नृत्यनाटिकेत कालिदासरचित या पहिल्या महाकाव्याचे नृत्यनाट्याच्या माध्यमातून मंचन होईल.याच दिवशी सव्वासहा वाजता ‘सावीची सावित्री कशी झाली’ हा कांचनलक्ष्मी सोनावणे अभिनित एकपात्री कार्यक्रम सादर होईल. संध्याकाळी साडेसहा वाजता प्रख्यात कीर्तनकार भंडारा इथल्या गौरी दाढी आणि आळंदीच्या ज्योती मतकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम रंगेल. रात्री साडेसात वाजता ‘शाहिरी फुलोरा’ हा आगळावेगळा शाहिरी जलसा रंगणार आहे. बालशाहीर तन्वी आंब्रे (मुंबई), पृथ्वीराज देवानंद माळी (सांगली), अंकुर परिहार ( जालना) महिला शाहीर कल्पनाताई माळी (सांगली), सीमा पाटील (मुंबई) युवा शाहीर निलेश जाधव, निशांत शेख (मुंबई) या नव्या दमाच्या जुन्या जाणत्यांकडून नावाजल्या गेलेल्या शाहिरांचा पहाडी आवाज कला अकादमीच्या प्रांगणात गुंजेल.
शनिवार ७ नोव्हेंबरची पहाट सकाळी साडेसहा वाजता ‘प्रात:स्वराचे रागरंग’ या उस्ताद अब्रार अहमद यांच्या मंत्रमुग्ध करणा-या संतूरवादनाने होईल. विविध मानाच्या मैफिली गाजवणारी युवा गायिका भाग्यश्री पांचाळे यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सकाळी साडेसात वाजता संपन्न होईल. संध्याकाळी साडेसहा वाजता म्युझिकल बँड ‘ध्वनी’ आपला परफॉमन्स सादर करतील.
नाट्यप्रिय तरुणाईसाठी शनिवारी ७ नोव्हेंबर रोजी रात्री दहा ते दुस-या दिवशी पहाटे सहा पर्यंत म्हणजेच संपूर्ण रात्रभर महाराष्ट्रातल्या विविध स्पर्धांतून गाजलेल्या एकांकिकांचा महोत्सव नाट्यजागर आयोजित करण्यात आला आहे.
रविवारी ८ नोव्हेंबरला पहाटे साडेसहा वाजता ‘प्रात:स्वरांचे रागरंग’मध्ये जलतरंग आणि सनईच्या जुगलबंदीचा तसेच मृदंगम वादनाचा कार्यक्रम सादर होईल.
या महोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य असलेला पुलंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वावर आधारित अभिवाचनाचा दृकश्राव्य कार्यक्रम ‘अपूर्व पुल’ सकाळी साडेदहा वाजता सादर होईल. संध्याकाळी साडेपाच वाजता सातारा जिल्ह्यातील फलटण येथील बाल कीर्तनकार कृष्णा महाराज फडतरे कीर्तन सादर करेल. संध्याकाळी सहा वाजता ‘तमाशाची रंगबाजी’ हा नामदेव मुरकुटे लिखित मेघा घाडगे दिग्दर्शित कार्यक्रम सादर होईल तर रात्री साडेआठ वाजता विद्यासागर अध्यापक लिखित दिग्दर्शित डायबेटिक जीवनशैलीवरचे शुगर फ्री नाटक ‘साखर खाल्लेला माणूस” सादर होईल या शिवाय मान्यवर तज्ञांच्या मार्गदर्शनाखालील विविध कलाविषयक कार्यशाळा ५ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान सकाळी अकरा ते पाच या वेळेत आयोजित करण्यात आल्या आहेत. यात रंगभूषा, आवाज, लोकगीते, पाश्चिमात्य नृत्य, लोकनृत्य, नाटक-नेपथ्य, माईम, भरतनाट्यम, लावणी, शाहिरी, वक्तृत्व, छायाचित्रण, मार्शल आर्ट्स, क्ले मॉडेलिंग, तैलचित्र, जलरंग चित्र, सुलेखन, व्यंगचित्र या कार्यशाळांचा समावेश आहे.
हे सर्व कार्यक्रम आणि कार्यशाळा विनामुल्य आहेत. सर्वार्थाने दर्जेदार असलेल्या या पु.ल युवा महोत्सवाच्या निमित्ताने चार दिवस रंगणा-या या कला सांस्कृतिक जागरात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक आशुतोष घोरपडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९९८७७१६९१२.