शिवाजी मंदिरात रंगणार अविस्मरणीय मैफिल!
रेडिओच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळातील संगीतपर्व गाजविणाऱ्यांचा सन्मान करणारा ‘रेडिओवाणी’ हा वाद्यवृंदाचा पहिला कार्यक्रम रविवारी, ४ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता शिवाजी नाट्यमंदिर, दादर (प ) येथे संपन्न होत आहे.
काळ कितीही झपाट्याने पुढे पुढे धावत असला तरीही भूतकाळ त्याचा पाठलाग करीतच असतो. जग संगणकाच्या माध्यमातून कितीही जवळ येत असलं किंवा घराघरात दूरदर्शन किंवा चित्रवाणी संचाने कुटुंबाचा कब्जा घेतला असला तरीही दोन शतकांहून अधिक काळापूर्वी जन्मास आलेल्या ध्वनीप्रयोग अर्थात रेडिओ त्यांच्यामुळे नामशेष झाला नाही तर तो आजही सर्वांचा मित्र म्हणून सर्वांसोबत आहे आणि विशेषतः संगीत प्रेमींसाठी तर रेडिओचं स्थान जिवलगासारखं आहे. अश्या या रेडिओच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील कोण्या एका सुवर्णकाळातील संगीतपर्व गाजविणाऱ्या गुणी परंतू दुर्लक्षित अश्या संगीतकारांचा त्यांच्याच लोकप्रिय ठरलेल्या गीताद्वारे सन्मान करण्याची संकल्पना आता रंगभूमीवर सादर केली जाणार आहे, त्या कार्यक्रमाचे शीर्षक आहे रेडिओवाणी.
ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील लोकप्रिय अरेंजर अशोक जाधव यांचे संगीत संयोजन ‘रेडिओवाणी’ला लाभले असून रफी, किशोर, तलत, मुकेश, लता, अशा, शमशाद, मुबारक अश्या गायकांची गाणी डॉ. अपर्णा मयेकर, वैशाली फडके, संध्या राव, शुभदा वेरेकर, राजश्री जाधव, अरुण तळेगावकर, ईश्वरी सोलंकी आणि नंदकिशोर कदम असे पार्श्वगायक सादर करतील.
प्रदीप दळवी गिटार वादक, रत्नाकर पिळणकर लेखक संगीतकार, नंदकिशोर कदम वास्तुरचनाकार व किशोरकुमार प्रेमी तर अशोक मुरकर सॅक्सोफोन वादक अश्या चार मित्रांनी एकत्र येऊन प्राण प्रॉडक्शन या नावाची संस्था स्थापन करून जुन्या काळातील गाणी नवनव्या संकल्पनांद्वारे आपल्या वाद्यवृंद वादक व गायकांच्या सहकार्याने रंगभूमीवर आणण्याचा निश्चय केला आहे.
रत्नाकर पिळणकर यांनी या संकल्पनेचं लेखन, दिग्दर्शन व निवेदन केलं असून नकलाकार कमलाकर बनसोडे त्यांना यात साथ देतील. संगीतकार चित्रगुप्त खेमचंद प्रकाश, सी अर्जुन, इकबाल कुरेशी, स्नेहल भाटकर, रोशन, उषा खन्ना, रामलाल, अश्या प्रसिध्दीलुप्त झालेल्या संगीतकारांची सर्वोत्कृष्ट यादगार गीते आणि सोबत त्या गीतनिर्मितीचे चटपटीत खुमासदार किस्से यात सादर केले जातील. ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील हा नवा प्रयोग संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल असं निर्माता दिग्दर्शक कलावंतांना वाटतंय.