‘स्टार प्रवाह’वर साजरी होणार महासंक्रांत
यंदाची मकरसंक्रांत संस्मरणीय करण्यासाठी स्टार प्रवाहने प्रेक्षकांच्या घराघरात साजरी करण्याचे ठरवले आहे. अमाप लोकप्रियता लाभलेल्या स्टार प्रवाहावरील मालिकांतील नायिकांच्या आयुष्यातल्या पार्श्वभूमीवर यंदाची महासंक्रांत १३ जानेवारीला संध्याकाळी साडेसहापासून साजरी होईल.
‘पुढचं पाऊल’मधल्या अक्कासाहेबांच्या जोडीला यंदा लेक माझी लाडकीमधली मीरा, दुहेरीमधली मैथिली, गोठमधली राधा आणि नकुशी या नव्या नायिका लोकप्रिय ठरल्या.
या यात महत्वाचे आकर्षण आहे ते म्हणजे नकुशी आणि अक्कासाहेब या सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या दोन नायिकांच्या मालिकेतल्या कथानकाचा महासंगम.
पुढचं पाऊल मध्ये सध्या ‘प्रेमाला जात नसते’ हा विषय हाताळला जातो आहे,जातीमुळे प्रेमाला विरोध असलेले तेजु आणि सत्या पळ काढून मुंबईला येतात,त्यांच्या पाठी लागलेल्या गुंडापासून स्वत:चा जीव वाचवताना त्यांना नकुशी आणि चाळकऱ्यांची मदत मिळते. पळून आलेल्या या मुलांबद्दल रणजीतचे मत काहीसे वेगळे असते,याचवेळेस या मुलांचा माग घेत अक्कासाहेब बग्गीवाला चाळीत पोहचतात, नकुशी आणि रणजीतच्या नात्यात सध्या अबोला आहे, त्या पार्श्वभूमीवर अक्कासाहेब, नकुशी आणि रणजीतच्या नात्यात गोडवा आणू शकतील का ?, त्या पळून आलेल्या मुलांचे काय होते. या उत्कंठावर्धक प्रश्नांची उत्तरे या महासंगम मध्ये प्रेक्षकांना मिळतील.
उपेंद्र लिमये आणि हर्षदा खानविलकर या दोन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवता येईल.
गोठ मधल्या राधाचीही यंदा लग्नानंतरची पहिली संक्रांत असून बयोआजींनी कपटाने म्हापसेकरांच्या घरात सून म्हणून आणलेल्या राधाच्या आयुष्यातल्या परीक्षेच्या क्षणाची विशेष उत्सुकता आहे. लेक माझी लाडकीमधल्या मीराचा आपल्या पालकांचा शोध यंदाच्या संक्रांतीत एक वेगळा टप्पा गाठणार का?, दुहेरीत मैथिली, नेहा, सुप्रिया यांची मकरसंक्रांत आणि सूर्यवंशी कुटुंबावर संक्रांत आणू पाहणारे बल्लाळ तसेच परसू हा उत्कंठावर्धक कथाभागही प्रेक्षकांना पाहता येईल.