दीपाली विचारेज अकॅडमी व आरतची प्रस्तुती
श्रृंगाररसाची अनोखी अनुभूती देणाऱ्या कथ्थक नृत्यावर आधारित ‘आराधना’ व ‘त्रिधारा’ हा कार्यक्रम येत्या रविवारी २२ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे रंगणार आहे.
प्रसिद्ध नृत्यांगना दीपाली विचारे यांच्या ‘दीपाली विचारेज अकॅडमी ऑफ आर्ट्स’ आणि ‘आरत’ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.
‘आराधना’ हा दीपाली विचारेज अकॅडमी ऑफ आर्ट्सचा वार्षिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात दीपाली विचारे यांच्या सगळ्या शिष्या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील गीतांवर ताल अंगाच्या साथीने कथ्थक नृत्याविष्कार सादर करतील. नृत्यांगना दीपाली विचारे व त्यांच्या सिनियर शिष्या त्रिधारा सादर करतील. त्रिधारेतून ‘श्रृंगारापासून भक्तीरसा’पर्यंतचा प्रवास दाखवला जाईल. त्रिधारेचे वैशिष्ट्य म्हणजे दीपाली विचारे यात स्वत: कवितेच्या सादरीकरणासह नृत्याविष्कार करणार आहेत.
सितार, तबला आणि घुंगरांची जुगलबंदी असलेल्या त्रिधारेतून नृत्याच्या वेगवेगळ्या छटांचे दर्शन रसिकांना घडेल. या एकत्रित आविष्कारातून साकार होणारी आराधना व त्रिधारा रसिकांच्या मनाशी वैश्विक नाते जोडेल असं सांगत हा कार्यक्रम रसिकांना निखळ आनंद देईल असा विश्वास दीपाली विचारे व्यक्त करतात.
कथ्थक नृत्याचे शास्त्रोक्त धडे देण्यासाठी व त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी दीपाली विचारे यांनी वीस वर्षापूर्वी ‘दीपाली विचारेज अकॅडमी ऑफ आर्ट्स’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबविण्याचा दीपाली विचारे यांचा मानस आहे.