गणेश आचार्य यांचे दिग्दर्शकीय पदार्पण
गणेश आचार्य दिग्दर्शित ‘स्वामी तिन्ही जगाचा : भिकारी’ या मराठी चित्रपटाचा मुहुर्त बिग बी अमिताभ बच्चन आणि हँडसम हंक टायगर श्रॉफ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मराठी चित्रपटाच्या मुहुर्ताला बिग बींनी उपस्थित राहण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. मुहुर्तावेळी बिग बी आणि टायगर श्रॉफ यांनी गणेश आचार्य यांना चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.

गणेश आचार्य हे नाव चित्रपटप्रेमींच्या चांगलं परियचाचं आहे. त्यात कोरिओग्राफी असलेली चिकनी चमेली सारखी अनेक गाणी प्रचंड गाजली आहे. त्याशिवाय स्वामी (२००७) , मनी है तो हनी है (२००८) आणि एंजल (२०११) या हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. अलीकडे मराठी चित्रपटा्तील गाजलेल्या आला होळीचा सण लय भारी, तुझी चिमणी उडाली भूर्रर्र, डॅशिंग गोविंदा अशा गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. मराठी चित्रपटांची कोरिओग्राफी करतानाच आता ते मराठीत दिग्दर्शकीय इनिंगही सुरू करत आहेत.
अनेक वर्षापासून मित्र असलेले गणेश आचार्य आणि शरद देवराम शेलार यांनी मी मराठा फिल्म प्रोडक्शनची स्थापना करून चित्रपट निर्मितीमधे प्रथम पाऊल टाकले आहे.
‘स्वामी तिन्ही जगाचा : भिकारी’ हा चित्रपट मोठ्या बिजनेस कुटुंबातील आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर बेतला आहे. स्टार अभिनेता स्वप्नील जोशी, रुचा इनामदार, गुरू ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, कीर्ती आडारकर, सुनील पाल आणि प्रदीप काब्रा अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
‘गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटानं स्वत:चा ठसा उमटवला आहे. उत्तम आशय आणि व्यावसायिक यश या दोन्हीचा मिलाफ मराठी चित्रपटांत होत आहे. मराठीत काम करताना सकस आशय ही मराठी चित्रपटांची ताकद असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे मला स्वत:ला बरीच वर्षं मराठी चित्रपट दिग्दर्शित करायचा होता. ती इच्छा या चित्रपटाच्या निमित्तानं पूर्ण होत आहे. वेगळं कथानक आणि उत्तम स्टारकास्ट हे चित्रपटाचं वैशिष्ट्यं आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटरसिकांना नक्कीच आवडेल,’ असं गणेश आचार्य यांनी सांगितलं.