‘मुंबई पुणे मुंबई ३’ची घोषणा!
पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ने सर्वत्र यश मिळवल्यानंतर ‘मुंबई पुणे मुंबई -२ लग्नाला यायचंच’ नावाने आला आणि त्याच यशाची पुनरुक्ती झाली. आता या चित्रपटांचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माता अमित भानुशाली आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी चित्रपटाचा तिसरा भागही आणण्याचे जाहीर केले आहे. या तिसऱ्या भागातही अभिनेते स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या गॉड अभिनयाची जुगलबंदी रंगणार आहे.
हा चित्रपट २७ एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये एखाद्या चित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या पार्श्वभूमीवर आणि तिसऱ्या भागाच्या निमित्ताने बोलताना राजवाडे म्हणाले, रसिक प्रेक्षकांना गौतम आणि गौरीच्या जीवना मध्ये आता काय घडते आहे ह्याची उत्सुकता लागली आहे कारण प्रत्येक प्रेक्षकांना गौतम आणि गौरीच्या गोष्टी ही आपली स्वताची गोष्ट वाटते. मूळ चित्रपट करताना त्याचा सिक्वेल येईल असे काही वाटले नव्हते. मुंबई पुणे मुंबई -2 लग्नाला यायचंच’ हा सिक्वेल करत असताना मात्र आम्ही चित्रपटाचा तिसरा भागही बनवू शकतो हे मात्र जाणवले होते. तिसऱ्या भागाच्या कथानकाबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही, पण पहिल्या दोन भागांप्रमाणेच तिसरा भागही प्रेक्षकांना आवडेल याची आम्ही हमी देऊ शकतो.” असे दिग्दर्शक सतीश राजवाडे.

पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपपाटाचे अनेक भारतीय भाषांमध्ये ‘रिमेक’ झाले तर जगभरच्या प्रेक्षकांना हा चित्रपट आपला वाटला. चित्रपटाचा पुढील भाग बनावा, अशी इच्छा प्रेक्षक व्यक्त करत होते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या हिट जोडीला पुन्हा एकदा बघण्याची उत्सुकता रसिकांना होती. रसिकांनी त्यांची पसंती ‘मुंबई पुणे मुंबई’ आणि ‘मुंबई पुणे मुंबई –2’ च्या तिकीट खिडकीवरील गर्दीतून आधीच व्यक्त केली होती.
‘मुंबई पुणे मुंबई – ३’चे सह-निर्माता 52 फ्रायडे सिनेमाजचे अमित भानुशाली म्हणाले की, ‘आमच्यासाठी ‘मुंबई पुणे मुंबई’ अतिशय खास आहे. कारण आम्ही निर्माण केलेला हा पहिला मराठी सिनेमा होता. ‘मुंबई पुणे मुंबई’च्या पहिल्या चित्रपटापासून ते २०१८ रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई – ३’चे पालकत्व आम्ही केले आहे. म्हणूनच आम्ही सर्व ‘मुंबई पुणे मुंबई -३’ चित्रपटाविषयी अतिशय उत्सुक आहोत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की ‘मुंबई पुणे मुंबई’ आणि ‘मुंबई पुणे मुंबई – २ लग्नाला यायचच’प्रमाणेच रसिक प्रेक्षक ‘मुंबई पुणे मुंबई -३’वरसुद्धा प्रेमाचा वर्षाव करतील.’
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा एक हटके चित्रपट म्हणूनही एक वेगळी ओळख या चित्रपटाला आहे. राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई-2 लग्नाला यायचंच’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांप्रमाणेच या चीत्रपटातही अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे हे दोन लोकप्रिय चेहरे मध्यवर्ती भूमिकेत दिसतील. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने आत्तापर्यंत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाईम प्लीज, मुंबई-पुणे-मुंबई २’, आणि ‘बापजन्म’चे यांसारखे अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.