चित्रकार शण्मुख तमाडा यांचे चित्र प्रदर्शन सुरु
सुप्रसिद्ध समकालीन चित्रकार शण्मुख तमाडा यांचे ‘प्लेझरेबल अँनक्सिटीस’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे दि २२ ते २८ ऑगस्ट २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता सुप्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या हस्ते झाले असून, कला सुप्रसिद्ध समीक्षक जॉनी एम एल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शण्मुख तमाडा हे विशाखापट्टणम येथील रहिवासी असून त्यांनी सुप्रसिद्ध शिल्पकार रविंदर रेड्डी यांच्याकडे कलेचे प्रशिक्षण घेतले आहे. शण्मुख हे विझाग कॉलेज ऑफ फाईन आर्टचे माजी विद्यार्थी आहेत.
शण्मुख यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कॅनव्हास वर वापरलेले फॉइल आणि ॲक्रीलिक हे अभिनव माध्यम. शण्मुख हे इंडस्ट्रीयल फॉइल्सचा वापर आपल्या कलाकृतींमध्ये करतात. या रंगीत फॉइल्स ना कौशल्याने वापरून ते त्यांना तेजस्वी रंगानी सजवतात आणि तयार होते ती अर्थपूर्ण कलाकृती. गेली दहा वर्ष शण्मुख फॉइल्स सारख्या वैशिष्ठ्यपूर्ण माध्यमात वेगवेगळे प्रयोग करत आहेत आणि त्त्यांच्या कलाकृती पाहून त्यांनी या माध्यमावर प्रभुत्व मिळवले आहे असेच म्हणता येईल. कारण या कलाकृती म्हणजे मन उल्हसित करणारी निसर्गचित्रे आहेत जी दर्शकांना त्रिमितीय अनुभव देतात. फॉइल्सच्या चमकदार रंगांमुळे कलाकृतींमध्ये तयार होणारी छाया दर्शकांना खिळवून ठेवते. दर्शकांच्या चित्तवृत्ती उल्हसित करण्याचा प्रयोग शण्मुख आपल्या कलाकृतींमधून यशस्वी करतात. त्यामुळे प्रकाश आणि अंतर यांना शण्मुख यांच्या कलाकृतीमध्ये महत्वाचे स्थान आहे. फॉइल्स हा घटक निर्जीव असला तरी त्यांच्यावर तयार होणारे छाया नाटय हे त्यांना जिवंतपणा प्रदान करतात. हा जिवंतपणा हेच शण्मुख यांच्या कलाकृतींचे महत्वाचे वैशिष्टय आहे.
हे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई – ४०० ००१ येथे रसिकांसाठी सकाळी ११:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत विनामूल्य खुले आहे. अभिनव माध्यमातील अर्थपूर्ण कलाकृतींचा अनुभव घ्यायचं असेल तर हे प्रदर्शन आवर्जून पाहावे.