तीन मित्रांच्या रंगलेखनाचे प्रदर्शन सुरु
सुप्रसिद्ध चित्रकार चार्ली कोरीया, प्रवीण शिंदे आणि राहूल कांबळे यांनी अलिकडच्या काळात साकारलेल्या चित्रकृतींचं ‘द जर्नी ऑफ व्हायब्राशन्स, इमोशन्स ऍन्ड लव्ह‘ हे समुह चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये १८ ऑक्टोबरपासून सुरु झाले असून, ते २४ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरु राहणार आहे.
प्रेमाची, मैत्रीची आणि कलाकाराच्या आयुष्याची सुरुवात कशी आणि कधी होते ते आकलनापलिकडचंच असतं आणि ते अधिक काळ तेवढ्याच ताकतीनं टिकवणं हेदेखिल तारेवरच्या कसरतीसारखंच. पण या सर्वासाठी एकमात्र गुण आवश्यक असतो तो ‘स्व-भाव’. शब्दाची फोड यासाठी की प्रत्येक ठिकाणी आपण ‘स्व-अनुभव’ घेत असतो. एकमेकांचा शोध घेऊन, भावनेच्या विचारांची देवाण-घेवाण करत असतो. असाच एक प्रकार तिघांच्या आयुष्यात आला, निमित्त होतं कलाविश्वाचं, कलाक्षेत्रात पदार्पण करण्याचं.
मुंबईच्या वांद्र्यातील एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रथम वर्षात चार्ली कोरीया, प्रवीण शिंदे आणि राहूल कांबळे हे कलाकार एकत्र प्रवेश करते झाले. तिघेहीजण वेगळ्याच विश्वातले. नावाप्रमाणेच तिघांच्या व्यक्तीमत्वात भिन्नाता होती. याच भिन्नतेने तिघेही एकत्र आल्याने वैचारीक पातळी आणि कलाक्षेत्रातील ओळख ही हळूहळू वृध्दींगत होत गेली. सर जे. जी कला महाविद्यालयात कला शिक्षक पदविका वर्गात प्रवेश घेतल्यानंतर तिघांच्याही मनाची गुणांची सांगड अधिक जुळली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कामाच्या व नोकरीच्या शोधात असतानाच वसई विकासिनी दृक कला विद्यालयात तिघांनाही एकत्र काम करण्याची संधी मिळाली. कलाक्षेत्रात एकाच वर्गातील वर्गमित्र, एकाचा कला महाविद्यालयात एकाच विभागात कलाअध्यापकाची कार्य करत असल्याचा अपवाद कदाचीत हाच असेल.


विरारचा चार्ली हा नावानेच वेगळा व सर्वांना आकर्षून घेणार्या व्यक्तीमत्वाचा. कारण 
स्वभाव व विचार हे दोन्ही निष्पक्ष. परंतु त्याच्या चित्रांमध्ये व्यक्तींच्या मनातील दडून बसलेल्या भावनांना व मनात निर्माण होणार्या कंपनांना जास्त महत्व असतं. त्या भावना तेवढ्याच निष्पक्ष दाखवण्यासाठी त्याने काळ्या आणि पाढर्या छटांचा वापर आपल्या चित्रात केला आहे.


मराठवाड्यामधून आलेल्या आणि मुंबईत स्थायीक झालेल्या प्रवीणमध्ये नावाप्रमाणेच प्रावीण्य आहे. कारण बर्याच खाचखडग्यातून प्रवास 
करीत तो आज इथपर्यंत पोहोचला आहे. हाच प्रवास तो आपल्या चित्रांमधून मांडत असतो. समाजाचा माणसांवर व माणसाचा समाजावर होणारा परिणाम, पारंपारिक गोष्टींमधील बदल, निसर्ग, अध्यात्म, भूत, वर्तमान, भविष्य अशा अनेक विषयांचा शोध तो त्याच्या चित्रांमधून मांडत आहे. आल्हाददायक व आकर्षून घेणारी रंगसंगती, विविध आकाराची रचना व मांडणी तो आप्ल्या चित्रांमधून मांडत आहे.

