कोल्हापूरच्या प्रत्ययने राज्य नाटय़ स्पर्धेत गुंफले अकरावे पुष्प
पनवेलमध्ये सुरू असलेल्या राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत सोमवारी कोल्हापूरच्या कलावंतांनी विचारवाही ‘क्राईम अँड पनिशमेंट’ नाटकांचे सादरीकरण करून रसिकांना खिळवून ठेवले. रशियन लेखक फ्योदोर दोस्तोयवस्की यांच्या कादंबरीवर आधारित हे नाटक असून, त्याचे मराठी नाटय़रुपांतर उदय नारकर यांनी केले आहे.
कोल्हापूरच्या `प्रत्यय हौशी नाटय़ कला केंद्रा’ने निर्मिलेल्या या नाटकाचे संतुलित आणि संयमी दिग्दर्शन पवन खेबुडकर यांनी केले आहे. गरिबीचे चटके सहन करत कॉलेजमध्ये शिकणारा एक तरुण एका सावकारिणीचा खून करतो. त्या खुनाचा गुन्हा कबुल करायचा की नाही, या प्रश्नाभोवती त्या तरुणाच्या मनोव्यापारावर हे नाटक भाष्य करणारे आहे. मूळ कथेच्या स्वभावानुसार हे नाटक कुठलेही आकांड-तांडव न करता, तांत्रिक बाबींचा अवडंबर न मांडता सादर करण्यात आले. त्यासाठी दिग्दर्शक पवन खेबुडकरचे अभिनंदन केले पाहिजे.
नाटकभर एकूण सात व्यक्तिरेखा रंगमंचावर येताता, मात्र त्या साऱयांची कथानकानुसार बांधणी करून फक्त तीन कलावंतांनी ही कथा रसिकांपर्यंत पोहचवली आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारताना त्या-त्या व्यक्तिरेखांच्या भावविश्वाची, पस्थितीशी साधर्म्य साधण्यात कलावंतांनी आपले अभिनय कौशल्य दाखवले. त्यासाठी ज्ञानेश चिरमुले-पवन खेबुडकर यांची वेशभूषा आणि विजय ढेरेच्या रंगभूषेने आपली ताकद दाखवून दिली आहे. पॉर्फीरी आणि मार्मलादेव अशा दुहेरी भूमिकेत दिलीप बापट यांनी तर सोनिया, अल्योन्या, लिझावेता आणि आई अशा चार भूमिका साकारून रसिया पडळकरने आपले अभिनय कौशल्य अधोरेखित केले आहे. रास्कोल्नीकफच्या मुख्य भूमिकेत असणारा आदित्य खेबुडकर यांनी या नाटकाचा डोलारा आपल्या भावविश्वी मनोव्यापारातून उत्तम साकारण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश चिरमुले यांचे नेपथ्य, हृषिकेश जोशी-नरहर कुलकर्णी यांचे पार्श्वसंगीत आणि समीर पंडितराव-हृषिकेश पोवार यांनी प्रकाशयोजनेची जबाबदारी समर्थपणे पेलली.