आपेट प्रमोद आणि संदीप छत्रबंद यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरु
पुण्याचे सुप्रसिद्ध चित्रकार आपेट प्रमोद आणि संदीप छत्रबंद यांनी अलीकडेच केलेल्या रंगलेखनाचे प्रदर्शन मुंबईतील एम. जी. रोडवरील प्रिन्स ऑफ वेल्स मुझियमच्या कुमारस्वामी हॉलमध्ये २ नोव्हेंबर २०१६पासून सुरु झाले आहे. ९ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणाऱ्या या प्रदर्शनातील कलाकृतींच्या जुगलबंदीच आस्वाद रसिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत विनामूल्य घेता येईल.
आपेट प्रमोद यांची चित्रे ग्रामीण भागातील जीवनशैलीशी नाते सांगणारी असून, त्या कलाकृतींना रंगमंचीय बॅकड्रॉपची झालर आहे. ग्रामीण जीवनातील साधेपणा, त्या व्यक्तिरेखांमधील उत्कटता आणि त्यांच्या गहिऱ्या नात्यांतील उत्कंठा रंगलेखकाने खुबीने टिपली आहे. त्यात सुखदुःखाची विविध स्वप्ने आणि त्या स्वप्नपूर्तीसाठीचे भावदर्शन या चित्रांमधून प्रतिबिंबित होतात.
संदीप छत्रबंद यांच्या रंगलेखनात धार्मिक वारसा सांगणाऱ्या वाराणसीतील ऐतिहासिक मंदिरे आणि नदीकिनाऱ्यावरील वास्तुशिल्पे रेखाटली आहेत. वाराणसीचा परिसर हा रंगलेखकांना नेहमीच खुणावत असतो. चित्रकार त्या परिसराच्या प्रेमात पडतो. मंदिरे आणि नदीघाटातील प्रसन्न वातावरण कुंचल्यात बंदिस्त करून आपल्या रंगलेखनाची श्रीमंती अधोरेखित करत असतो. याचीच प्रचिती देणारा संदीप छत्रबंद यांचा हा चित्रसंग्रह आहे. ही चित्रे बघताना आपण वाराणसीच्या नदीकिनाऱ्यावरच आहोत, इतका जिवंतपणा या कलाकृतींमध्ये आहे. या चित्रांमध्ये रंगलेखकाने प्रतिबिंबित केलेला छायाप्रकाश या कलाकृतींचे बलस्थान सांगणारा आहे.