प्रणिता प्रवीण यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन
अहमदनगर येथील चित्रकर्ती प्रणिता प्रवीण हिच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन जहांगीर कलादालन, हॉल नं. ४, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई येथे १६ एप्रिल ते २२ एप्रिल २०१८ दरम्यान भरणार असून, ते रसिक व कलाप्रेमींना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या कालावधीत विनामूल्य बघता येईल.
प्रदर्शनाचे उद्घाटन १६ एप्रिल २०१८ रोज संध्याकाळी ५ वाजता सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांच्या हस्ते होणार असून, त्यावेळी मान्यवर आमदार राजपुरोहित, श्रीराम दांडेकर (कॅम्लिन कंपनीचे अध्यक्ष), भरत दाभोळकर (प्रसिद्ध कलादिग्दर्शक) आणि कलाविश्वातील अनेक प्रतिथयश व्यक्ती हजर राहतील. या प्रदर्शनातील चित्रविक्रीतून मिळणाऱ्या लाभाचा काही अंश ‘स्नेहालय’ या संस्थेस गरीब व गरजवंतांसाठी दान दिला जाईल.
प्रस्तुत प्रदर्शनात प्रणिताने आपल्या कलात्मक संवेदनांचा व जाणिवांचा उपयोग करून एक वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार सादर केला आहे. प्राचीन भारतीय संस्कृती व तिची वैशिष्ट्ये, अर्वाचीन जगताशी त्यांचा असणारा संबंध व आधुनिक जगताशी त्यांचे असणारे अनन्यसाधारण महत्त्व आणि आवश्यकता या अनोख्या कल्पनेवर आधारित तिने आपली चित्रे सादर केली आहेत. वारली लोककला व ती संस्कृती आणि तिचे महत्त्व आपल्या चित्रांमधून तिने विशद केले असून त्यातून ती आपल्या सांगितिक परिभाषेतील लयबद्धतेचे व नादमयतेचे चित्ररूपातून दर्शन घडविते.
ॲक्रिलिक रंगलेपनातून कॅन्व्हासवर साकारलेल्या तिच्या विविध चित्रांमधून धार्मिकतेची व आधुनिकतेची घातलेली सांगड आणि त्या प्रकटीकरणातून साधलेला दृश्यपरिणाम अनोखा व अभूतपूर्व असाच जाणवणारा असल्याने या सर्वांचा रसिकमनावर योग्य तो परिणाम होतो. सुलभीकरण व संक्षेपीकरण परिवर्तन, पुनर्आयोजन व शोध यासारख्या विविध संकल्पनांचा अर्थपूर्ण व आशयघन असा वापर करून साकारलेली तिची चित्रे पारदर्शकता स्पष्टता व आशयघनता ह्यांचा सर्वांना प्रत्यय देतात. त्याचप्रमाणे संगीतातील लयबद्धता व नादमयता ह्यांची अनुभूती सर्वांना योग्य तऱ्हेने होते.
विविध रेषा, भूमितीय आकार, विविधांगी प्रतिके व त्यांचा योग्य असा वापर करीत असताना तिने देवीदेवतांची भित्तिचित्रे, अजंठा-वेरूळसारख्या लेण्यातील असणारी गुंफाचित्रे, विविध शिल्पचित्रे वगैरेचा आधार घेतला. तसेच कृष्णप्रेम, ममता, उखळबंधनम्, गोवर्धनउद्धारणम्, राधाकृष्ण, एकांतवास (विजनवास), ३ संगीतकार, चंद्रिका, नदीकिनारा, गायिका, कृष्ण, येळकोट, बासरी, भावनिक गुंतवणूक वगैरे चित्रातून तिने साकारलेला विश्वप्रेमाच्या व्यापक संकल्पनेची सर्वांना अनुभूती होते.
परिवर्तनशीलता, आशयघनता, लयबद्धता, नादमयता आणि प्रत्येक दृश्यातील सुस्पष्टता व पारदर्शकता वगैरेंनी नटलेला हा नयनरम्य व भावपूर्ण तसेच कलात्मक आविष्कार प्रत्येक सह्रदय कलाप्रेमी व रसिकाला आवडेल असाच आहे. त्याचा सकारात्मक तसेच उदंड प्रतिसाद व प्रशंसा लाभून प्रणिता बोरा हिला त्याद्वारे योग्य ती प्रेरणा आणि उत्तेजन मिळेल आणि आपल्या उर्वरित कलाप्रवासात अधिक आशयघन व कलात्मक आविष्कार सादर करण्याची स्फूर्ती तिला प्राप्त होईल हे निर्विवाद.